तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Thursday, 14 November 2019

कसोटीत सर्वाधीक धावा बनविणारे अग्रणी भारतीय फलंदाज


             माजी पंतप्रधान पंडित जवाहरलल
नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून देशभर साजरा होत असताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतंर्गत कसोटीचा विद्यमान विश्वविजेता भारत व पाहुणा संघ बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला इंदोरमध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी विंडीजविरूध्द २ व दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३ कसोटी जिंकून गुणतालिकेत २४० गुणांसह अव्वल स्थानावर असून ही मालिकाही भारत खिशात घालून कसोटी विश्व अजिंक्यप्द टिकविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे.
             भारताच्या ८७ वर्षांच्या कसोटी इतिहासात अनेक रथीमहारथी फलंदाज आपली कलाकारी दाखवून गेले. परंतु त्यामध्ये केवळ ३ जण दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम ग्रेट ओपनर सुनिल गावस्कर, विक्रमादित्य सचिन तेंडूलकर व दि वॉल राहुल द्रविड यांचा समावेश आहे. तरी आपण प्रस्तुत लेखात भारताकडून आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या काही निवडक फलंदाजांवर एक नजर टाकणार आहे.
             सचिन रमेश तेंडुलकर केवळ भारतासाठीच नव्हे तर अखिल जगतात कसोटीत सर्वाधीक धावा करणारा फलंदाज आहे. विश्वविक्रमी २०० कसोटयात ३२९ डाव खेळून १५९२१ धावा करताना सर्वाधीक ५१ शतकांचा नजरानाही त्याने जागतिक क्रिकेट पटलावर पेश केला आहे.
               द वॉल, मिस्टर भरोसेमंद, मिस्टर रिलायबल असे अनेक बिरूदे आपल्या नावापुढे का चिकटले हे सिद्ध करताना राहुल द्रविडने भारतासाठी अनेकदा संकटमोचकाची भूमिका साकारली आहे. राहुलने सचिन तेंडुलकरनंतर दोन नंबरची कामगिरी करताना ३६ शतकांसह १६४ कसोटीत १३२८८ धावा आपल्या खात्यात जमवल्या आहेत.
                भारताचा आजवरचा सर्वोत्तम सलामीवीर ठरलेल्या सुनिल गावस्करने १२५ कसोटयात ३४ शतके व ४५ अर्धशकांसह १०१२२ धावा काढल्या आहेत.विशेष म्हणजे कसोटीत १० हजार धावा बनविणारा जगातला पहिला फलंदाज सुनिल गावस्कर होय. सुनिल गावस्कर निवृत्त झाला तेंव्हा वरील सर्व आकडे विश्वविक्रमी गणले जात होते. पुढे जात ते सर्व विक्रम सचिन तेंडुलकरने मोडीत काढले.
                व्हीव्हीएस लक्ष्मण हा भारतीय क्रिकेटला लाभलेला अतिशय विश्वसनीय व मनगटी खेळाचा महान खेळाडू होता. १३४ कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व करताना २१४ डावात ७८८१ धावा करत चौथ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला.
                   भारताच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेला विरेंद्र सेहवाग हा घणाघाती फलंदाज या क्रमवारीतील पाचवा सदस्य आहे. सेहवाग एकूण १०४ कसोटी खेळला. त्यामध्ये २३ शतके व ३२ अर्धशतके ठोकली असून ८५८६ धावा केल्या आहेत. कसोटीतील तो भारताचा पहिला त्रिशतकवीर असून त्याच्या नावे कसोटीत २ त्रिशतके आहेत.
                   या मातब्बर फलंदाजांनंतर सौरव गांगुली ७२१२ व विद्यमान कर्णधार विराट कोहली ७०६६ काढून सध्या सक्रीय आहे. बघू या कोहली वरील कोणा कोणाला मागे सारून वरचा क्रमांक गाठतो ?
लेखक : - दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.