तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 December 2016

ग्राहक हीत जोपासण्याला शासनाचे प्राधान्य

विनोद तायडे
वाशिम, दि. ३१ :  ग्राहकाचे हित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून त्यादृष्टीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला सेवा हमी कायदा ग्राहकांच्या हिताचा असून यामुळे विविध शासकीय सेवा वेळेत मिळणे शक्य झाल्याचे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) अरुण देशपांडे यांनी आज जिजाऊ सभागृह येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले की, ग्राहक हित जोपासण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ग्राहकांशी संबंधित शासकीय विभागांचे प्रमुख व ग्राहकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रत्येक महिन्याला होते. यामध्ये ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. जिल्हास्तरावरील या महत्वाच्या बैठकीला सर्व संबंधित विभागांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असून तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी तातडीने निकाली निघण्यास मदत होईल. राज्य शासनाने ग्राहक धोरण निश्चित करण्याचे ठरविले असून असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे यामाध्यमातून फसवणूक झाल्यास अथवा या सेवेबद्दल कोणाकडे दाद मागायची, याविषयी ग्राहक संभ्रमात असतात. अनेकवेळा ऑनलाईन शॉपिंगची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

ग्राहकांच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक अथवा व्हॉटसअपद्वारे स्वीकारण्याची सुविधाही अनेक शासकीय विभागांनी उपलब्ध करून दिली आहे. औषधे, हॉटेल अथवा खाद्य पदार्थविषयक कोणतीही तक्रार असल्यास ती अन्न व औषध प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर स्वीकारली जाते. तसेच कमाल विक्री मूल्य (एमआरपी) पेक्षा अधिक दर आकाराला जात असल्यास अथवा वस्तूच्या वजनविषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी वैधमापक शास्त्र विभागाने अमरावती विभागाकरिता असलेल्या ९४२२२५८८०० या व्हॉटसअप क्रमांक व मुंबई कार्यालयाचा ०२२-२२८८६६६६ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तरी या क्रनाकावर ग्राहकांनी आपल्या तक्रारी देवून त्यांचे निराकरण करून घेण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले.

No comments:

Post a comment