तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

चुकून घर पाडलं, ठाणे महापालिकेच्या कारवाईमुळे कुटुंब रस्त्यावर....!


_________________________

ठाणे महापालिकेने चुकीच्या कारवाई मुळे एका कुटुंब रस्त्यावर आलं आहे. ठाण्याच्या नौपाडा भागात एका धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाने, या इमारतीच्या मागे असलेल्या घरावर कारवाई केली. मात्र यात पोलिस आणि महापालिका प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न केल्याने, आता या प्रकरणातून वेगळ्याच संशयाचाधूर येऊ लागला आहे. ठाण्याच्या नौपाडा भागात घंटाळी मंदिराजवळ जेम्स कॉटेज ही इमारत आहे.1980 साली बांधलेली ही इमारत धोकादायक बनल्याने, 2015 साली ठाणे महापालिकेने तिचा धोकादायक इमारतींमध्ये समावेश करत, रहिवाशांना जागा सोडण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार इथले रहिवासी स्थलांतरितही झाले.मात्र या इमारतीच्या उभारणीच्या आधीपासून इथे माड्ये कुटुंब अजूनही वास्तव्यास होतं. शिवाय त्यांचं घरही धोकादायक झालेलं नव्हतं. मात्र तरीही महापालिकेने गेल्या शुक्रवारी अचानक माड्ये कुटुंबाचं हे राहतं घर पाडून टाकलं. शिवाय इमारतीत राहणाऱ्या वकील शिल्पा सावंत यांच्या घराचं कुलूप तोडून त्यांचं सामान फेकून देण्यात आलं. यानंतर हादरलेल्या माड्ये कुटुंबाने सावंत यांच्यासह याबाबत नौपाडा प्रभाग समितीशी संपर्क साधला असता इमारतीवर कारवाई करायची होती, मात्र चुकून तुमच्या घरावर कारवाई झाली, असं धक्कादायक उत्तर नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी त्यांना दिलं. शिवाय सोमवार पर्यंत नवीन घर बांधून देण्याचं आश्वासनही दिलं. तर शिल्पा सावंत यांच्या घरातलं गायब झालेलं सामान कुठे आहे..? याबाबत उत्तर देण्यातही ते असमर्थ ठरले. या संपूर्ण प्रकरणाची आणखी एक बाजू म्हणजे जेम्स कॉटेज इमारतीतील रहिवाशांनी एका विकासकाला जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचे हक्क दिले आहेत. मात्र त्यात अडथळा ठरणारं माड्ये यांचं घर अशाप्रकारे चुकून पाडण्यात आल्याचं बोललं जातं आहे.त्यामुळे याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला. यावेळी फक्त इमारतच नव्हे, तर संबंधित घरही धोकादायक होतं, असं उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. शिवाय मारुती गायकवाड यांच्या बाबत होत असलेल्या या आरोपांची चौकशी करुन आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येईल, असं आश्वासन महापालिका उपयुक्त संदीप माळवी यांनी दिलं आहे. महापालिकेच्या या कारवाईनंतर शिल्पा सावंत आणि माड्ये कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यातही धाव घेतली. शिल्पा सावंत यांच्या घरातलं सामान गहाळ झाल्या प्रकरणी आणि अनधिकृतपणे घर तोडल्या प्रकरणी पोलिसांनी तक्रार घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी पाच तास बसवून ठेवूनही कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप केला जात आहे.

No comments:

Post a Comment