Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

लक्झरी बसना सकाळी सातनंतर मुंबईत ‘नो एण्ट्री’


मुंबई शहरात वाहनांची वाढलेली संख्या आणि विविध मोठय़ा प्रकल्पांचे सुरू असलेले काम यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून मुंबईत लक्झरी बसना सकाळी सातनंतर ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. इतकेच नाही तर रस्त्याच्या कडेला त्यांच्या पार्किंगवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना गावावरून येताना बसला उशीर झाला तर मुंबईबाहेरच उतरावे लागणार आहे.

वाहनांची संख्या वाढल्यामुळे तसेच रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात आलेल्या बडय़ा वाहनांमुळे मुंबईत विशेषकरून दक्षिण मुंबईत वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक सुरळीत चालावी आणि नागरिकांना कोणत्याही प्रकराचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत खासगी बसेस आणि जड वाहनांना मुंबईत ‘नो एण्ट्री’ असेल. तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यावर पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे.

पे ऍण्ड पार्क

दक्षिण मुंबईत येणाऱया आणि बाहेर जाणाऱया सर्व खासगी बसेस केवळ पे ऍण्ड पार्क या जागेतच पार्किंग कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. जड वाहनांनादेखील हाच नियम लागू असून स्वतःच्या अथवा भाडय़ाने घेतलेल्या जागेतच ही वाहने पार्किंग करावीत.

फ्रीवेवर बंदी

दक्षिण मुंबईत थेट पोहचण्यासाठी बनविण्यात आलेल्या फ्रीवेवर २४ तास अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

या वाहनांना वगळले

एस. टी. बस, बेस्ट बस, शाळेच्या बस, मुंबई दर्शन बस, अत्यावश्यक सेवा (भाजीपाला, दूध, ब्रेड, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल), रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने.

दक्षिण मुंबईत मध्यरात्रीनंतरच एण्ट्री

मुंबईत सकाळ, संध्याकाळ बंदी घालण्यात आली असली तरी दक्षिण मुंबईत तर केवळ मध्यरात्रीनंतरच एण्ट्री असेल. मध्यरात्री १२ ते सकाळी ७ या वेळेतच दक्षिण मुंबईत एण्ट्री दिली जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे...

No comments:

Post a Comment