Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

जन्मदाती आईच ठरली पोटच्या गोळ्याचा काळ

लोणावळा : जन्मदात्या आईनेच आपल्या अडीच महिन्याच्या पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली आहे.
शितल भांगरे असे निर्दयी आईचे नाव आहे. शीतल हिचे दिड वर्षापुर्वी उर्से गावातील दत्तात्रय भांगरे यांच्याशी लग्न झाले होते. आठवडाभरापुर्वी शितल ही आपला अडीच महिन्याचा मुलगा शंभू याला घेऊन तिच्या माहेरी पांगोळी गावात आईकडे राहावयास आली होती. शंभू हा जन्मजात अशक्त होता आणि त्यातच आरोपी शीतल ही त्याला व्यवस्थित स्तनपान करू शकत न्हवती आणि त्यातूनच तिने हे कृत्य केले असल्याचे शीतल हिचा पती दत्तात्रय भांगरे याने फिर्यादीत म्हंटलं आहे. तसेच शीतल ही मनोरुग्ण असल्याचेही समोर आले आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शितल हिने तिचा अडीच महिन्याचा मुलगा शंभू ह्याला अचानक घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकले. त्यानंतर सकाळच्या सुमारास शंभू यास गुंडाळून ठेवलेले कापड विहिरीतील पाण्यावर तरंगताना मिळून आले. सदर घटना लोणावळा शहर पोलीस स्टेशनला कळल्या नंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी पांगोळी ग्रामस्थ आणि शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाच्या साहाय्याने विहिर तसेच गावाचा परिसर शोधून काढला मात्र दिवसभर बाळाचा शोध लागला नाही. अखेर विहिरीच्या तळाशी शोध घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या आय.एन.एस. शिवाजीच्या पाणबुड्याने सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
या प्रकरणी आरोपी शीतल दत्तात्रय भांगरे  हिच्या विरोधात भादवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. शिवाजी दरेकर हे करीत आहे.

No comments:

Post a Comment