Breaking News
Loading...

Friday, 15 September 2017

शिवसेना नेत्याच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप तेज न्यूज हेडलाईन बीड जिल्हा प्रतिनिधी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड : तीन वर्षापूर्वी बीड तालुक्यातील काळेगाव हवेली येथील शिवसैनिक मधुकर शिंदे यांचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा निकाल लागला असून जिल्हा न्यायाधीश एस. आर. कदम यांनी अशोक पवार, अनिल पवार आणि देविदास पवार या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १० आॅगस्ट २०१४ रोजी रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान काळेगाव हवेली येथील शिवसेना नेते मधुकर शिंदे हे शिवसेनेची शाखा उघडण्यासाठी पोखरीकडे निघाले असता ढेकणमोहा ते काळेगाव रस्त्यामधे त्यांच्यावर आरोपी अशोक पवार, अनिल पवार आणि देविदास पवार या तिघांना धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यावेळी रिक्षातून जाणारे सुशिल शिंदे, जगन्नाथ पवार, संतोष पवार, दिपक पवार, दिपक कांबीलकर आणि अप्पासाहेब पवार यांना मधुकर शिंदे यांची मोटारसायकल रस्त्यावर पडलेली दिसल्याने ते थांबले असता त्यांना शेजारच्या शेतात जखमी अवस्थेत पडलेल्या मधुकर शिंदे यांनी आवाज दिला आणि वरील तिन्ही आरोपींनी हल्ला केल्याचे सांगितले. यानंतर गंभीर अवस्थेत दवाखान्यात नेण्यात आलेल्या मधुकर शिंदे यांना तपासून डाॅक्टरांनी मयत घोषित केले.

याप्रकरणी सुशील शिंदे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर तपास सहा. पोलीस निरिक्षक मधुकर प्रधान यांनी केला. याप्रकरणाची सुनावणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान १२ साक्षीदारांचे जवाब नोंदविण्यात आले. यामधे सुशिल शिंदे आणि जगन्नाथ पवार यांची साक्ष महत्वाची ठरली. मयत मधुकर शिंदे यांना त्यांच्या मुलीसमोर आरोपी अशोक पवारने दिलेली जीवे मारण्याची धमकी, घटनास्थळावर आरोपीच्या शर्टच्या बटनचा तुकडा आणि मयत शिंदे यांच्या शरीरावरील धारदार शस्त्रांचे १५ वार या सर्व बाबी आरोपींचा गुन्हा सिद्ध करण्यात महत्वाच्या ठरल्या.  या सर्व बाबी ध्यानात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांनी आरोपी अशोक पवार, अनिल पवार आणि देविदास पवार यांना मधुकर शिंदे यांच्या खून प्रकरणी दोषी ठरवित जन्मठेपेची आणि प्रत्येकी २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील ॲड. एम. के. वाघीरकर यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment