तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेंमध्ये आघाडीवर:-मुकेश कांबळे

अकोले (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील विद्यार्थी हा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आघाडीवर दिसत असल्याचे मत अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी व्यक्त केले.

चितळवेढे येथील शेतकरी कुटुंबातील मिथीलेश शांताराम आरोटे याची नुकतीच भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत 2016 - 17 या वर्षात ऑल इंडिया रँकमध्ये 58 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेतून केंद्र सरकार मधील विविध अभियांत्रिकी विभागांसाठी अधिकार्‍यांची निवड केली जाते. आरोटे यांचे शिक्षण चितळवेढे येथील जिल्हा प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत व माध्यमिक शिक्षण हभप सावित्राआई विद्या मंदिर विठे येथे झाले. त्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 91.82 टक्के गुण प्राप्त करत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला होता. शासकीय तंत्रनिकेतन नाशिकमधून यंत्र अभियांत्रिकी विभागातून डिप्लोमामध्ये 89.75 टक्के गुण प्राप्त केले. आमरावती येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याची डीग्रीचे शिक्षण पुर्ण झाले. तर नुकत्याच भारतीय अभियांत्रिकी सेवा दिल्ली परीक्षेत देखील त्याने राज्यातून 58 वा क्रमांक मिळविला आहे.
मिथीलेशच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देवून तहसीलदार मुकेश कांबळे व जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच मुकेश कांबळे यांची अकोलेचे तहसीलदार कार्यभार स्विकारल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, अण्णासाहेब चौधरी, विष्णू आरोटे, सुरज कानवडे आदी उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, आपण देखील विविध स्पर्धा परीक्षांमधून इतपर्यंत प्रवास केला असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना शेवटपर्यंत आशावादी असावे. विविध स्पर्धा परीक्षा या आपल्या जीवनाच्या मार्गदर्शिका ठरतात. विद्यार्थ्यांनी पालकांचे स्वप्न साकार केले तर त्याचा आनंद गावालाच नव्हे संपुर्ण राज्याला होत असतो. तर चितळवेढे गावातील या तरुणाने मिळविलेले यश हे त्याच्या जिद्द, चिकाटीचे फलीत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच चितळवेढे गावातील शेतकर्‍यांच्या सात, बारा उतार्‍यावर निळवंडे प्रकल्पाचे नाव असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय मिळत नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी तहसीलदारांकडे भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी चितळवेढे येथील शेतकर्‍यांच्या जमिनी निळवंडे धरणासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शासनाने काही रकमा शेतकर्‍यांना देवू केल्या.

या प्रकल्पासाठी या जमिनीची शासनाला गरज नाही, असे न्यायालयाला कळविले असता भूसंपादन विभागामार्फत संपुर्ण घटनेचे माहिती घेवून नोव्हेंबर पर्यंत चितळवेढे गावातील शेतकर्‍यांच्या सात, बाराचा जिव्हाळयाचा प्रश्‍न शंभर टक्के मार्गी लावून यासाठी शेतकर्‍यांनी शासनाला सहकार्य करावे. ज्या शेतकर्‍यांनी पैसे घेतले होते. ते पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावे. त्यामुळे लवकरच येथील शेतकर्‍यांचा तिढा सुटेल असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

फोटो छाया - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मिथीलेश शांताराम आरोटे याची नुकतीच भारतीय अभियांत्रिकी सेवेत ऑल इंडिया रँकमध्ये 58 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देवून तहसीलदार मुकेश कांबळे व जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर दुसर्‍या छायाचित्रात मुकेश कांबळे यांची अकोलेचे तहसीलदार कार्यभार स्विकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे.

No comments:

Post a Comment