तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

मोरेश्वर महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त साक्षरता दिंडी.

भोकरदन(दि.08),येथील राष्ट्रीय सेवा योजना मोरेश्वर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त साक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. साक्षरता दिंडी महाविद्यालयातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवान डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

साक्षरता दिंडी मोरेश्वर महाविद्यालयातून सुरु झाली. विद्यार्थ्यांनी हातात साक्षरता दिंडीचे बॅनर घेतलेले होते. रॅलीत दोन दोन विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या रांगा बनविल्या होत्या. काही विद्यार्थीनींच्या व काही विद्यार्थ्यांच्या हातात साक्षरतेचा संदेश देणारे फलक झळकत होते.“शुद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा.’’ हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार घेऊन मुले चालू लागली. “उठा शुद्रांनो,अतिशुद्रांनो जागे होऊन उठा बंधुंनो शिकण्यासाठी उठा.” विद्येविणा मती गेली,मतीविणा गती गेली…या म.फुलें यांच्या विचारांबरोबरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा, संघर्ष करा…या विचारांचे फलक विद्यार्थ्यांच्या या दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.

साक्षरता दिंडी महाविद्यालयातून भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानासमोरुन पंचायत समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन, ग्रामीण रुग्णालय, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोरुन बसस्टॅड समोरील चौरस्त्यावरील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून पुन्हा महाविद्यालयात दिंडीची सांगता झाली. दोन दोन च्या रांगेत शिक्षणाचे फलक उंचावत स्लोगनच्या घोषणा देत विद्यार्थी मोठ्या संख्येने चालले होते. सोबत महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका होत्या.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोवर्धन मुळक, डॉ.रघुनाथ सपकाळ, प्रा.कवित्रा वळवी, प्रा. भरत पिंपळे,डॉ.सुरेखा जैस्वाल,प्रा.सत्यकुमार राठी, डॉ.संजय बिरंगणे,डॉ.भगवान सोनवणे, डॉ.विठ्ठल गायकवाड,प्रा.डी.बी.तायडे, प्रा. नवलसिंग तोडावत यांच्यासह प्राध्यापक दिंडीत हजर होते. तुकाराम भांबिरे,मंगेश यशवंते यांच्यासह असंख्य स्वयंसेवक  हजर होते. दिंडीची सांगता शेवटी महाविद्यालयात झाली. मुलांना रिफ्रेशमेंट रुपात नाश्ता देण्यात आला. चहापानानंतर कार्यक्रम संपन्न झाला. 

 

No comments:

Post a Comment