तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 January 2018

तिहेरी दुर्घटनांत चार जण ठार रेवकी गावकर्‍यांवर शोककळा


सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि.31 __ येथील वायरमनचा कणकवली भागामध्ये शॉक लागून एकाच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आणण्यासाठी भाऊ,पुतण्या आपल्या नातेवाईकांसह गेले होते. मृतदेह घेऊन येताना त्यांच्याही गाडीला मादळमोहीजवळ अपघात होऊन त्यामध्ये पंधरा वर्षीय पुतण्यासह चालकाचा मृत्यू झाला तर यांच्या अंत्यसंस्कारासाठी रेवकी-देवकीवरून मोटारसायकलवर निघालेल्या दोघांना रात्रीच भरधाव वेगात येणारा वाळुचा ट्रॅक्टरच्या धडकेत त्यामध्येही एक जण जागीच ठार झाला असून  अन्य एक जखमी झाला. या विचित्र आणि रेवकी-देवकीवर शोककळा पसरवणार्‍या तीन घटना २४ तासांमध्ये घडतात. दुसरीकडे संतापलेले रेवकीदेवकीचे नागरीक तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद करा,त्यांना अटक करा म्हणत बीड-जालना महामार्गावर ठिया मांडून बसले व जोपर्यंत वाळू माफियावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे गेवराई तालुक्यात पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनात गोंधळ उडाला असून रेवकीदेवकीवर मात्र प्रचंड शोककळा पसरली.
या दुर्दैवी तिन अपघातांची सविस्तर माहिती अशी की मूळचे रेवकीदेवकी येथील गेवराई येथे राहणार्‍या कृष्णा मस्के हे कणकवली भागामध्ये वायरमन म्हणून काम करतात. काल त्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. याची माहिती मस्के कुटुंबियांना झाल्यानंतर त्यांचा मृतदेह आणण्यासाठी भाऊ बंडु मस्के, त्यांची पत्नी आणि बंडु मस्के यांचा १५ वर्षीय मुलगा वैभव मस्के हे तिघे कणकवलीला गेले. रात्री कृष्णा मस्के यांचा मृतदेह घेऊन ते गेवराईकडे येत असताना मादळमोहीजवळ मध्यरात्री दरम्यान चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला, गाडीने तीन ते चार पलट्या घेतल्या. या अपघातात पंधरा वर्षीय वैभव मस्के आणि स्विफ्ट कारचा चालक विशाल अशोक घोडे (रा. राजपिंप्री) हे दोघे जागीच ठार झाले. तर गाडीमधील बंडु मस्के व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेपाठोपाठ कृष्णा मस्के यांचा मृतदेह गेवराईत येणार आहे म्हणून रेवकी येथील आदिनाथ बाबूराव बाबरे व अशोक साहेबराव थोरात हे दोघे मोटारसायकल (क्र. एम.एच. २३ ए.व्ही. ५८०४) ने गेवराईला येत असताना या मोटारसायकलला वाळुच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. त्यामध्ये आदिनाथ बाबरे हे ठार झाले तर अशोक साहेबराव थोरात हे जखमी झाले. कृष्णा मस्के यांच्या मृत्यूनंतर गेवराईत दोन अपघात झाले असून मोटारसायकलला वाळुच्या ट्रॅक्टरने उडवल्यामुळे रेवकी-देवकीचे नागरिक प्रचंड संतापले. या गावातील चौघा जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अख्खं गाव गेवराईत डेरेदाखल झाला असून रुग्णालयात आलेल्या लोकांनी संतापून जावून वाळु माफीयांवर कठोर कारवाई करा म्हणत दवाखान्यासमोरील राष्ट्रीय महामार्ग २११ वर रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. पाऊन तासाच्या आंदोलनामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली. या घटनेने संतापलेले लोक पाहता घटनास्थळी तहसीलदार पवार पोलिस निरीक्षक आहेर आले परंतु या दोघांच्या आश्‍वासनावर लोक उठत नसल्याने जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि पंचायत समिती सभापतीचे पती अभयसिंह पंडित हे घटनास्थळी आले. या वेळी विजयसिंह पंडितांनी वाळु माफीयांचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असं म्हणत उपस्थित गावकर्‍यांना शांत केले यानंतर त्यांच्या मध्यस्थिने हे आंदोलन मागे घेण्यात आले.यानंतर या सर्वांवर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment