तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन.


दि.१४/०३/२०१८
         जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 वर्षी राहत्या घरी आज दि.14 मार्च 2018 रोजी निधन झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्याचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. तर आई इझाबेल या पदवीधर होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हॉकिंग दापंत्य उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला आले.  स्टीफन यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. गणित विषयात विशेष आवड असलेल्या स्टीफन यांनी 17व्या वर्षी कॉसमॉलॉजी या विषयात स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. 1962मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आणि पुढील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1962च्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये घरी असताना त्यांना त्रास होऊ लागला. डॉक्टरांना देखील रोगाचे अचूक निदान सापडत नव्हते. 8 जानेवारी 1963ला म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षी स्टीफन यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपते. स्टीफन जास्ती जास्त दोन वर्ष जगतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्यानंतर या अवलियाने व्हील चेअरवर बसून फक्त एक बोट वापरून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात भरीव असे योगदान दिले. 

एक नजर स्टीफन यांच्या जीवन कार्यावर....  

     लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे वाख्याना ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.

स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.

१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.

एक अवलिया काळाच्या पडद्याआड

 'अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' या ग्रंथाने त्यांना जगबरात लोकप्रियता मिळवली 
विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांनी मोठे योगदान दिले. 
ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली
 १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयरचा पुरस्कार
 स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर The Theory of Everything हा चित्रपट 2014मध्ये प्रदर्शित झाला होता.
 २००९ मध्ये 'प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम' हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला

•••••••••••••••••••••••••••••••••
        अर्जुन फड
इतिहास अभ्यासक व लेखक
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मोबा :- ९९२१३८१००५
www.arjunphad1005.blogspot.in

No comments:

Post a Comment