तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

आज ४ मार्च आज चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले

आज ४ मार्च
आज चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि 'सॅल्युलाईड मॅन' अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचा स्मृतीदिन.
प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि ४
जन्म. ६ एप्रिल १९३३ केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे.
परमेश कृष्णन नायर म्हणजेच पी के नायर यांचे तिरूअनंतपुरम येथेच शालेय आणि उच्च शिक्षण देखील झाले. मोठे होत असताना, त्यांच्यावर तमिळ भाषेमधील पौराणिक चित्रपटांचा विशेष पगडा होता आणि तेंव्हापासूनच त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी केरळ विद्यापीठातून पदवी मिळवली, पण त्यांचे सर्व लक्ष मात्र चित्रपटांकडे होते आणि शेवटी १९५३ साली, ते केरळमधील सगळे सोडून मुंबईमध्ये आले आणि त्यांचा एक अनोखा प्रवास सुरु झाला. विशेष म्हणजे नायर यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून, त्या काळी काम केले आहे. नावेच घ्यायची झाली, तर बिमल रॉय किंवा मेहबूब खान, तसेच ऋषिकेश मुखर्जी आणि अजून अनेक मान्यवर दिग्दर्शक. पण त्यांना चित्रपट बनवण्याची कला शिकताना हे उमजले, की ते चांगले दिग्दर्शक कदाचित होऊ शकणार नाही. त्यासाठी लागणारे कौशल्य किंवा प्रतिभा त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच १९६१ साली त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया’ (एफ.टी.आय.आय) येथे रिसर्च असिस्टंट हे पद स्वीकारले. नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया संग्रहालयाची सुरुवात देखील याच संस्थेतून झाली. १९६४ साली संग्रहालयाची स्थापना झाली आणि त्यानंतरच नायर यांची नेमणूक असिस्टंट क्युरेटर म्हणून तिथे करण्यात आली. नायर यांना ‘प्रभात फिल्म कंपनी’, ‘वाडिया मुव्हीटोन’ आणि ‘जेमिनी स्टुडियो’ने बनविलेल्या चित्रपटांच्या संग्रहाचा खूप अभिमान होता. तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक, हे त्यांचे खास मित्र होते आणि त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट आज चित्रपट संग्रहालयात शाबूत आहेत. ऋत्विक घटकांची ‘मेघे ढाका तारा’ त्यांना नायर यांना खूप आवडायची. नायर यांनी शून्यातून हे संग्रहालय उभे केले आहे. त्यांनी जवळपास १२००० चित्रपट संग्रहित केले आणि त्यामधील तब्बल ८००० चित्रपट भारतीय आहेत. जुन्या चित्रफिती, भारताच्या काना कोपऱ्यातून शोधणे आणि त्यांचे संवर्धन करून त्या कायमच्या संग्रहित करणे, या कामाने नायर झपाटलेले होते. त्यांनी अनेक जुने, हरवलेले असे चित्रपट मिळविले आणि शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संवर्धन केले. भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे  ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.२०१२ साली शिवेंद्रसिंग डुंगरपुर या चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने नायर यांच्या आयुष्यावर एक माहितीपट बनविला आणि तो म्हणजे ‘सेल्युलॉईड मॅन’. या माहितीपटाने नायर यांचे आयुष्य पूर्णतः उलगडले आणि त्यांच्या कामाचे महत्व लोकांसमोर आणले. या माहितीपटाला २ राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. हा माहितीपट बनवला गेला नसता, तर खूपच कमी जणांना नायर यांच्या कामाची माहिती आणि महत्व कळाले असते. ‘सेल्युलॉईड मॅन’ने नायर यांचे आयुष्यच संग्रहित केले आहे. नायर यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.  पी. के. नायर हे पुण्यातील आशय फिल्म क्लबचे अध्यक्षही राहिले होते. पी. के. नायर यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.
संदर्भ.इंटरनेट

No comments:

Post a Comment