तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

आता बस्स झाले परिवर्तनाची तयारी करा:-शरद पवारांचे आवाहन

नाशिक : आता बस्स झाले परिवर्तनाची तयारी करा आणि यांना खड्यासारखं बाजूला करा. तरुणांना, शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी यासाठी आजपासूनच कामाला लागावं असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेत केला.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप आज अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने नाशिक येथे झाला. सुरुवातीला जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मानापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी जे हल्लाबोल आंदोलन केले ते प्रचंड यशस्वी झाले याबाबत शरद पवार यांनी आनंद व्यक्त करून तुमचा संदेश दिल्लीपर्यंत नक्कीच पोहोचेल असे सांगितले.

ब-याच दिवसांनी मी आज नाशिकमध्ये आलो आहे. नाशिकमध्ये नवीन काही मिळतय का ते मी पाहत होतो. कारण मला असं कळलं की नाशिक मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. पण या बापाने कधीही या शहराकडे डुंकूनही पाहिले नाही. असा बाप आम्हाला नको. भाडोत्री बापाची आम्हाला गरज नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. आजचे राज्यकर्ते मोठे गंमतीदार आहेत. घोषणा करण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. मुक्तपणे बोलायचे आणि करायचे काहीच नाही म्हणून राज्यात एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे. कृषी हा देशाचा कणा आहे. सगळ्यांच्या भूकेचा प्रश्न शेतकरी सोडवू शकतो पण आज शेतीची अवस्था काय आहे ? शेतकऱ्यांच्या मुलांनी कुणाकडे बघायचे ही स्थिती आजच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली आहे. आज देशात आत्महत्यांची परिस्थिती काय आहे ? सरकारने कोर्टात अशी माहिती दिली की देशात १२ हजार शेतकरी प्रत्येक वर्षी आत्महत्या करतात. खरंतर त्यापेक्षाही अधिक शेतकरी आत्महत्या करत असतात. याचा अर्थ सरकारचा शेती विषयीचा दृष्टीकोण काय आहे हे यातून दिसून येते. आत्महत्यांचे दर आणखी वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

खानदेशच्या धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांची जमीन सरकारने घेतली मात्र मागत असलेला मोबदला सरकारने दिला नाही त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला. आता त्यांच्या पत्नीही म्हणत आहेत की आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हीही त्याच मार्गावर जाऊ. राज्यात जर अशा गोष्टी घडत असेल तर सत्ताधारी काय करत आहे ? यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. यासाठीच हा हल्लाबोल आहे. हा हल्लाबोल आपल्याला देशाच्या कान्याकोपऱ्यात न्यायचा आहे. तरुण पिढीची अवस्था बिकट आहे. रोजगार नाही. लोकसंख्या वाढत आहे. जमिनी कमी होत चालल्या आहेत. अशामध्ये सगळ्यांनीच शेती करून चालणार नाही असे पवार यांनी म्हटले.

नाशिक महत्त्वाचा जिल्हा आहे. येथिल लोक प्रचंड मेहनत घेतात मात्र सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहत नाही. शेतीचे उत्पन्न घटले आहे. ज्वारी, बाजरी, तूर, सुर्यफुल या सर्व पिकांचे दर घटले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही म्हणून हे होत आहे. पूर्ण कर्जमाफी देण्याची ताकद या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. सरकारने पुरेपुर कर्जमाफी केली नाही. नोटाबंदी होउन आज वर्षे उलटले तरी जिल्हा बँकांचे पैसे सरकार स्वीकारत नाही. हा पैसा गोरगरिबांचा पैसा आहे सरकार म्हणत आहे की पैसे बदलून देवू शकत नाही. बँकांना सांगितले जात आहे की नुकसान दाखवा तसे पत्र पाठवले जात आहे. यांची निती काय हे यातून स्पष्ट होते.

आता बस्स झाले परिवर्तनाची तयारी करा आणि यांना खड्यासारखं बाजूला करा. तरुणांना, शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी यासाठी आजपासूनच कामाला लागावं असे आवाहन शेवटी पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment