तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

एसआरपीएफ भरती घोटाळा : आणखी दोन आरोपींना अटक, दोन उत्तरपत्रिका जप्त.


येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १२ अर्थात एसआरपीएफच्या पोलीस भरती घोटाळ्यामध्ये व्हिडीओ फुटेज जप्त करण्यात आले असुन नव्याने दोन उत्तरपत्रिका देखील जप्त केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी दिली आहे. या प्रकरणात आता आणखी दोन आरोपींची संख्या वाढल्याचेही मदने यांनी सांगितले आहे.हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलात सन २०१३, २०१४ आणि २०१७ या तीन वर्षामध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान घोटाळा झाल्याचे समोर आल्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये ११ मे रोजी २६ आरोपींविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. एसआरपीच्या २० निलंबीत जवानांच्या उत्तरपत्रिका १४ मे रोजी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज पोलीस उपाधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांच्यासह तपास पथकाने दुसऱ्या दिवशीही एसआरपीएफच्या कार्यालयात जाऊन गुन्ह्याच्या तपासा विषयीची माहिती घेत या काळातील व्हिडीओ फुटेज ताब्यात घेतले. २० जवानांना गुण वाढ देत भरती करुन घेण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये पुढे आल्यानंतर आणखी दोन जणांना देखील गुणवाढ देऊन नोकरी बहाल केल्याचे तपासा मध्ये समोर आल्याने या दोन उत्तरपत्रिका देखील जप्त केल्याचे डीवायएसपी राहुल मदने यांनी सांगितले.या दोन जवानांची नावे गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरु असुन या दोघांची नावे देण्यास पोलीसांनी नकार दिला आहे. पोलीस तपासामध्ये आणखीही बऱ्याच गोष्टी बाहेर येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली असुन इतर काही जणांना देखील गुणवाढ देऊन भरती करुन घेण्यात आले आहे का, याबाबतचा तपास सुरु असल्याचेही पोलिसांकडुन सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment