तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

मुख्य कार्यकारी अधिकारी, घाटीच्या अधिष्ठातांसह ३२ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटिसा’.


मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आयोजित आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीस गैरहजर अधिकाऱ्यांचे प्रकरण नूतन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गांभीर्याने घेतले असून, बैठकीस गैरहजर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, घाटीच्या अधिष्ठातांसह ३२ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ जारी केल्या आहेत.आगामी मान्सूनच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात १४ मे रोजी नैसर्गिक आपत्ती, मान्सूनपूर्व तयारी आणि उपाययोजनासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. विषय गंभीर असल्याने जिल्ह्यातील सर्व संबंधित ६४ अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावण्यात आले होते, मात्र या बैठकीकडे अध्र्याहून अधिक जबाबदार अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. आपत्ती व्यवस्थापन सारखा गंभीर विषय असताना बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल जिल्हाधिकारी चौधरी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत ३२ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा मागवला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पहिल्या बैठकीस अधिकारी गैरहजर राहिल्याने मान्सूनपूर्व तयारीची जिल्हा प्रशासन पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असून तालुकानिहाय संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाचा त्यात आढावा घेतला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शेळके यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, शासकीस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा कृषी विकासअधिकारी सा. को. दिवेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींचा समावेश आहे. गैरहजर अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा मागितला आहे.

No comments:

Post a Comment