तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

कर्नाटकात आमदारांची पळवा पळवी


कर्नाटकची विधानसभा त्रिशंकू स्थितीत असल्यानं आमदारांच्या फोडाफोडीला वेग आल्याचं चित्र दिसतं आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 37 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे जेडीएसनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र भाजपाच्या नेतृत्वानं एका रात्रीत जेडीएस आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपानं कर्नाटकात 'गोवा पॅटर्न' राबवला आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या 12 नवनिर्वाचित आमदारांनीपक्षाच्या बैठकीला दांडी मारली आहे. तर जेडीएसचे दोन आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याचं वृत्त आहे. भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आठ आमदारांची आवश्यकता आहे आणि काँग्रेस-जेडीएसच्या 'गायब' झालेल्या आमदारांची एकूण संख्या 14 इतकी आहे. त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. जेडीएसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पक्ष कार्यालयात बैठक होती. मात्र या बैठकीला राजा व्यंकटप्पा नायका आणि व्यंकटा राव नाडागौडा हे दोन आमदार अनुपस्थित राहिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. काँग्रेसच्या आमदारांचीही आज पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. काँग्रेसचे 78 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी 66 आमदार बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे 12 आमदार नेमके गेले कुठे, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी लगेचच राजभवन गाठून सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेस-जेडीएसचे आमदार त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या संपर्कात नसताना येडियुरप्पा यांनी आपण उद्या सत्ता स्थापन करू, असा दावा केला. त्यामुळे भाजपानं कर्नाटकमध्ये गोवा पॅटर्न राबवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गोव्यात सर्वात मोठा पक्ष नसतानाही भाजपानं काँग्रेसला धक्का देत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळीही एका रात्रीत भाजपाच्या चाणक्यांनी राजकीय जुळवाजुळव केली होती.

No comments:

Post a Comment