तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

ब्रिटिशकालीन मंदिरे पाडण्यास सक्त विरोध : आज धुळे बंद.


धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या काठालगत रस्ते साकारताना ब्रिटिश कालीन मंदिरे पाडण्यास आमचा सक्त विरोध आहे. मंदिर पाडण्यासाठी आग्रही असणारे शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा आम्ही निषेध करतो. त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी आणि नागरिकांच्या भावना काय आहेत हे प्रशासनाने जाणून घेण्यासाठी शिवसेनेसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवार, १६ मे रोजी धुळे बंदची घोषणा दिली. दरम्यान, रविवारी रात्री दगडफेक होऊन जेसीबी यंत्राचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह १० जणांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी दुपारी नदीकाठावरील कालिकादेवी मंदिराच्या सभामंडपातच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरामण गवळी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, पंकज गोरे, संजय वाल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शहराचे भाजप आमदार अनिल गोटे हे विकासाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करीत आहेत. पांझराकिनारी रस्ता साकारायचा आहे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची कुंपण भिंत, जेल प्रशासनाच्या जागेची कुंपण भिंत बाजूला सारता येऊ शकते, पण हिंदूच्या भावना दुखावतील, विरोधकांकडून विरोध झाला पाहिजे या उद्देशानेच आमदार गोटे काम करीत असतात. कोणत्याही परिस्थितीत मंदिरे हटवू दिली जाणार नाहीत. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास आम्ही तयार आहोत असा सूर बैठकीस उपस्थित असलेल्या साऱ्यांनी लावला. धुळे शहरातील सर्वच व्यापारी आणि नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment