तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शिशिर शिंदेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’...?


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असून मनसेचे नेते शिशिर शिंदे हे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करुन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. शिशिर शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले असून या वृत्ताबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना ओळखले जायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गेल्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. तेव्हापासून शिशिर शिंदे नाराज असल्याचे वृत्त होते.शिशिर शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचे वृत्त असून ते लवकरच मनसेला जय महाराष्ट्र करुन शिवसेनेत प्रवेश करतील, असे वृत्तात म्हटले आहे. या वृत्ताबाबत शिशिर शिंदे, मनसे आणि शिवसेना या पक्षांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शिशिर शिंदे यांनी गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, असे म्हटले होते. तेव्हा देखील शिशिर शिंदे मनसे सोडणार, अशी चर्चा रंगली होती.

No comments:

Post a Comment