तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 June 2018

वेरुळ: शांतीगिरीजी महाराज यांना धमकीचे पत्र, आसाराम करू किंवा ढगात पाठवू

वेरुळ- जनार्दन स्वामी ( मौनगिरीजी ) महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी शांतीगिरीजी महाराज यांना शुक्रवारी धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात 'शांतिगिरी आपल्याला ढगात पाठवण्याची किंवा आसाराम बापू करण्याची तयारी झाली आहे. बघतोच आता', असा मजकूर आहे. पत्राच्‍या लिफाफ्यावर पत्र पाठवण्‍याचे नाव नितिन गणेश मोरे असे लिहिण्‍यात आले असून पत्‍ता केवळ 'नाशिक' एवढाच‍ लिहिण्‍यात आला आहे.

 या संदर्भात खुलताबाद पोलिस स्टेशनमध्‍ये संबंधित व्यक्तीवर गणपत म्हस्के यांनी धर्मपीठाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक हरीश खेडकर पुढील तपास करत आहेत. गुन्‍हा दाखल करताना शांतीगिरी महाराज भक्‍तपरिवाराची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.

राजकीय किंवा उत्तराधिकारी पदावरुन धमकी - स्वामी शांतीगिरीजी महाराज

'सद्यस्थितिला न्यायालयामध्ये उत्तराधिकारी पदासह विविध दावे प्रतिदावे चालू आहेत. तसेच आम्ही आमची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. यातूनच ही धमकी आली असावी, असे आम्हास वाटते.', असे स्‍वामी शांतिगिरीजी महाराज यांनी म्‍हटले आहे. 

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रूग्णालयात वृक्षारोपण

संग्रामपुर [प्रतिनिधी] - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणरागिनी संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आज संग्रामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्थानिक ग्रामीण रूग्णालयात वृक्षारोपण करून मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी मा.जि.प.उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ,डॉ. इंगळे वै.अधिक्षक ग्रा.रुग्णालय वरवट बकाल,डॉ. पंकज पंचभुते,डॉ.. खान सर,डॉ. चव्हाण सर,डॉ, शिरसाठ सर ,डॉ. सोळंके सर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षलागवड करण्यात आले.
व रेनवॉटर हार्वेस्टिंग, व वृक्षलागवडीचे महत्व व गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी सांगीतले. या वृक्षारोपणाला नारायण ढगे ता.अध्यक्ष संग्रामपूर ता.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,पंकज ठाकरे ता.अ.यु.संग्रामपूर, सेवादल जि संघटक सोनाजी वावरे , ओबीसीसेल ता अ गणेश बावस्कार विश्वासराव डोसे,तेजराव डोसे, योगेश डोसे उपसरपंच जस्तगाव , दुर्गासिंग सोळंके , दादाराव बोदडे, संग्रामपुर शहर अ राजेश गिरी, अमृतकर लाला भटूरा,,सह आदी बहुसंख्यांक  कार्यकर्ते उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीचे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करन्याची मागणी

वाशिम-दिनांक 23/06/18 वाशिम तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी नुकतीच पेरन्या केल्या होत्या बियाणे व निघालेल्या पिकासह जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्या होत्या परंतु पुन्हा 27 व 28 जून ला अतिवृष्टी झाली आणि पुन्हा जमिनी खरडून गेल्या आहेत त्या जमिनीचे तात्काळ  पंचनामे करून मदत जाहीर करावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदन देते वेळी वाशिम पंचायत समिती चे सभापती गजाननराव भोणे, वाशिम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महादेवराव सोळंके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गोटे, पंचायत समितीचे सदस्य भागवत भोयर, पी पी अंभोरे,सतिष दुबे, दत्ता नगुलकर, प्रदीप पांढर, श्रीधर इंगळे, बबन सावळे,संतोष आवारे, गंगाराम पडघाण, ज्ञानदेव भुतेकर, गजानन भुतेकर इत्यादी पदाधिकारी व मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

जिल्हा जात पडताळणी समितीकडुन विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न


माळीवाडा पाथरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सुर्यकांत नंदकिशोर नाईक हा दि. २ जुलै २०१८ पासुन परभणी येथे राजपुत भामटा जात वैधता प्रमाणपत्र विनाअट व सरसकट मिळावे या मागणीकरीता उपोषणास बसणार आहे.पण आता जिल्हा जात पडताळणी समितीने हे उपोषन नियमबाह्य दाखवले आहे. कारण या विद्यार्थ्यांच्या उपोषणामुळे भ्रष्ट जात पडताळणी समितीचे चांगलेच धाबे दणाणलेले दिसत आहेत त्यामुऴेच ही जिल्हा जात पडताळणी समिती या राजपुत समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत .जात पडताळणी समितीने गरीब राजपुत समाजातील विद्यार्थ्यांकडे राजपुत भामटा नावाचे पुरावे नसल्याकारणाने या विद्यार्थ्याना राजपुत भामटा वैधता प्रमाणपत्र देण्यास असमर्थता दर्शविलेली आहे.
तरी जिल्हा जात पडताळणी समितीने ज्यांचे आजपर्यंत राजपुत भामटा वैधता प्रमाण पत्र बनलेले आहेत त्यांनी असे कोणते राजपुत भामटा नावाचे पुरावे जोडलेले आहेत त्याची प्रत सार्वजनिक जाहीर दाखवावी.
यावरुण एक प्रश्न उपस्थित राहातो की, जिल्हा जात पडताळणी समितीला केवळ दलालांमार्फत पैसे भरुन बनवलेले राजपुत भामटा जात वैधता प्रमाणपत्रच वैध वाटते की काय..?तरी आता जात पडताळणी समितीने गरीब राजपुत समाजाचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही जोपर्यंत राजपुत समाजाला सरसकट राजपुत भामटा जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही किंवा आत्ता पर्यंत ज्यांना ज्यांना राजपुत भामटा वैधता प्रमाणपत्र दिले गेले आहे त्यांचे राजपुत भामटा वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय हा गरीब राजपुत समाज मागे हटणार नाही.

दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची धुरा.


दत्ता पडसलगीकर यांनी  राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे आज आपल्या ३७ वर्षांच्या आयपीएस सेवेनंतर निवृत्त होत असून त्यांच्या जागी सध्या पोलीस सेवेत सर्वात ज्येष्ठ असलेले मुंबईचे दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झाली आहे. पडसलगीकर यांच्या जागी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे ४१वे पोलीस आयुक्त म्हणून सुबोधकुमार जयस्वाल यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.येत्या ३१ ऑगस्ट रोजी दत्ता पडसलगीकर हे देखील सेवा ज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, पडसलगीकर यांनी गेली ३६ वर्षे केलेली निष्कलंक सेवा वमुंबईची वाहिलेली यशस्वी धुरा पाहता या प्रामाणिक अधिकाऱ्याला राज्य व केंद्र शासन ऑगस्टनंतर सहा महिने मुदतवाढ देणार आहे अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुंबईचे आयुक्तपद व पोलीस महासंचालकपद रिक्त होणार असल्याने ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परमवीर सिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ठाण्यात केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी फेब्रुवारी महिन्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्याचे महासंचालक म्हणून अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय बर्वे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संजय बर्वे हेही पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.

सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस उद्या एक दिवस रद्द.


सोलापूर-पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वर इलेक्ट्रीक काम करण्याचे नियोजित असल्याने रविवारी १ जुलै रोजी एक दिवस हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे दरम्यान दररोज धावणारी हुतात्मा एक्सप्रेस इ- ब्लॉक मुळे रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून लाखो प्रवासी पुण्यात अडकून पडणार आहेत. हुतात्मा एक्सप्रेस सोलापूरहून सकाळी ६.३० ला सुटते तर पुण्याहून सायंकाळी ६ वाजता सोलापूरकडे प्रस्थान करते. पुण्याला कामाला असणारे अनेक सोलापूर कर या गाडीने प्रवास करतात. गेल्या वर्षी १ नोव्हेंबर २०१७ ते ६ मार्च २०१८ पर्यंत सोलापूर-पुणे इंद्रायणी बंद करण्यात आली होती. उद्या रविवारी १ जुलै २०१८ रोजी रविवारी एक दिवसासाठी ह्या एक्सप्रेसला इ-ब्लॉकमुळे थांबादेण्यात आला आहे. प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलेआहे.

आयोगाचा अहवाल येताच तात्काळ मराठा आरक्षण लागू - चंद्रकांत पाटील.


मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार बांधील आहे ते देणारच. मात्र त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष काढणारा अहवाल देणे अपेक्षित आहे. त्यांचा अहवाल आल्यावर क्षणाचाही विलंब न  करता तात्काळ मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तसा अध्यादेशही काढण्यात आला. त्यानंतर हा विषय न्यायालयात गेला. न्यायालयात राज्य २७०० पानांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. मात्र न्यायालयाने सरकारने नाही, तर मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणचा चेंडू मागासवर्ग आयोगाच्या कोर्टात गेला. त्यातच राज्य सरकारची आयोग स्थापनेपासून सुरुवात होती. त्यामुळे मराठा आरक्षणाला विलंब होणार हे सिध्द झाले.  त्यातच न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्यास विलंब होत असल्याने राज्य सरकारचे कान उपटले होते.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना मागासवर्ग आयोगाचे काम कुठपर्यंत आले आहे याची माहिती दिली. ते म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर तो स्वीकारून विधिमंडळाच्या दोन्ही  त्यास सभागृहाची मान्यता घेऊन मराठा समाजाला आरक्षण लागू केले जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विजय मल्ल्याला हजर होण्याचे आदेश .


मनी लाँन्ड्रिंग विशेष प्रतिबंध (पीएमएलए) न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार व उद्योगपती विजय मल्ल्याला २७ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित राहण्यास समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचनालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर हे समन्स त्याला बजावण्यात आले आहे. 'पीएमएलए' प्रकरणातील विशेष न्यायाधीश एम. एस. अझमी यांनी मल्ल्याला नोटीस धाडली आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचनालयाने त्याच्या विरोधात दोन आरोपपत्र दाखले केली आहेत. त्यानंतर २२ जूनला न्यायालयात त्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची मागणी केली होती.'पीएमएलए' कायद्यांतर्गत १२ हजार ५०० कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचनालयाने मुंबई येथील विशेष न्यायालयात धाव घेतली होती. 'पीएमएलए'  कायद्याने अंमलबजावणी संचनालयाला आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आहे. यावेळी मल्ल्या उपस्थित राहिला नाही , तर त्याच्या नावे असलेली संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे.

पालम येथे सलमान खान मित्रमंडळाच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम संपन्न

अरुणा शर्मा

पालम :- येथे सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्य राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या सलमान खान मित्र मंडळाच्या कार्यक्रमास पालम शहरातील सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तरी या कार्यक्रमासाठी पालमच्या  तहसीलदार तेजस्वीनी जाधव तसेच नांदेड येथील आधार हॉस्पिटलचे डॉक्टर संजय कदम, शिवसेनेचे संतोष भाऊ मुरकुटे, पालम नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, माजी उपनगराध्यक्ष असदुल्ला खॉन पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वसंत काका शिरसकर,  पंचायत समितीचे उपसभापती रत्नाकरजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तुषार भाई गोळेगावकर, सय्यद अली पूर्णा, पालम पोलीस निरीक्षक महेश शर्मा, नगरपंचायतचे मुख्याधिकारी हेमंत केरुळकर, कृषी अधिकारी कांबळे, पालमचे तलाठी राठोड, महावितरणचे स्वामी, भटक्या विमुक्त संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉक्टर संजयजी बालाघाटे तसेच नगरसेवक लालखॉ पठाण, रहमत खॉ पठाण, कैलास रुद्रवार, विजय घोरपडे, मोबीन खुरेशी, शेख अकबर, पालम शहरातील पत्रकार डॉक्टर असोशियन व्यापारी असोशियन उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलमान खान मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले यावेळी सर्वाचे सलमान खान पठाण यांनी सत्कार केले. हा कार्यक्रम मोठया उत्सवात संपन्न झाला.

गेवराई-तलाठी मारहाण प्रकरणी दोघांना अटक, आरोपीस कोठडी

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. 30 __ चोरटी वाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठ्याला जिवे मारण्याचे गंभीर प्रकरण शुक्रवार, दि .29 रोजी दुपारी घडले होते. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस उपनिरीक्षक शरद पवार यांनी तातडीने दोन आरोपींना अटक करून शनिवारी गेवराई न्यायालयाने दोघांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
     गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना शुक्रवार, दि. 29 रोजी दुपारी वाळू तस्करी करणाऱ्या गावगुंडांनी मारहाण केली होती. मारहाणीत संबंधित तलाठी जखमी झाले आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, राज्यातील महसूल विभागात खळबळ उडाली होती. या प्रकरणी तलवडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. शनिवारी आरोपी अशोक गिरी, गंगाधर घाटूळ या दोन आरोपींना गेवराई न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अटक करून दोघांना अटक केली आहे. दरम्यान वाळू माफियाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी येथील महसूल विभागाच्यावतीने लेखणी बंद आंदोलन करून तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर ठिय्या मांडला. यामध्ये महसूलचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी, लिपिक यांच्यासह सर्वांनी सहभाग नोंदवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी घटनेतील आरोपी वर कडक कारवाई करून वाळू पट्टयातील तलाठ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी तलाठी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
     आंदोलनात मंडल अधिकारी नालमे, काशीद, पुराणिक, ठाकूर, माने यांसह सर्व मंडल अधिकारी तसेच तलाठी संघटनेचे अध्यक्ष जे.एस. लेंडाळ, परमेश्वर काळे, जावेद शेख, ढोले, शेंबडे पाटील ठाकूर सर्व तलाठी, लिपिक नामदेव खेडकर, पी. टि.पाटील, राजपूत, शेख लतीफ यांच्यासह सर्व महसूलचे अधिकारी कर्मचारी यांनी लेखनी बंद आंदोलन करत नायब तहसीलदार भंडारे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

लाचखोर क्रीडा मार्गदर्शक शिर्शीकर जेरबंद

दहा हजारांची लाच घेताना अटक

परभणी : मोइन खान

व्यायाम शाळा साहित्य खरेदीसाठी मंजूर झालेले अनुदान मिळण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक बालाजी आनंदराव शिरसीकर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवार30 रोजी  दुपारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात केली. 

तक्रारदार महिला एका सेवाभावी संस्थेच्या अधीक्षक आहेत. त्यांना 2017-18 अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून व्यायाम शाळा साहित्य खरेदीसाठी अनुदान मंजूर झाले आहे. परंतू सदरील साहित्य मिळण्यासाठी शिरसीकर यांनी 15 हजार रूपयांची मागणी केली असल्याची  तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. या तक्रारीनुसार शनिवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी शिरसीकर यांना दहा हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आलें. त्यांच्या जवळून 10 हजार रूपये हस्तगत करण्यात आले असून त्यांच्या विरूध्द नवा मोंढा पोलिात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदरील कारवाई पोलिस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एन.एन.बेंबडे, पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकरण, विवेकानंद भारती, पोह हनुमंते, पोशि अविनाश पवार, पोना गुरसुडकर, धबडगे, पोना अनिल कटारे, पोह जहागीरदार, लक्ष्मण मुरकुटे, पोशि चट्टे, पोना मुखीद, पोह चौधरी, पोना बोके, मपोशि टेहरेे यांनी केली.

नेत्यांच्या बुडाखाली येतात खुर्च्या कार्यकर्त्याच्या नशिबी फक्त मोर्चा अन चर्चा

!! आता कसं ?? साहेब म्हणतील तसं !!
आता कसं ?
हे तुम्हाला आताच कळणार नाही पण जेव्हा कळेल तेव्हा प्रगतीची वेळ निघून गेलेली असणार, त्यावेळी तुमच्या कडे पैसा, प्रतिष्ठा, उमेदीचं वय, काहीच नसणार. लग्न झालं नसेल तर कोणी पोरगी द्यायला सुद्धा तयार होणार नाही !!
हा बऱ्याच तरुण मित्रांचा अनुभव आहे आणि अनुभव हीच खात्री असते.
हल्ली प्रत्येक ठिकाणी भाऊ, दादा, तात्या,अण्णा, बाबा,काका, साहेब अश्या वेगवेगळ्या नावाचे नेते, भुरटे नेते, डॉन, आधारस्तंभ, यांचा सुळसुळाट झालाय.
काहींच्या गळ्यात तर कुत्र्याला शोभेल अश्या साखळ्या, कपाळावर वाकडे तिकडे गंध, हातात बैलाला शोभेल असले गंडे-दोरे, कडे-कुडे असतात. कोल्हापुरी चपला, स्टार्च केलेले पांढरे शुभ्र कपडे अन गाडी नंबरपासून ते अगदी मोबाईल नंबरपर्यंत सगळंच कसं व्हीआयपी असतं. पण ते कसं आलं हे विचारू नका कारण त्याच्या सर्व वाटा त्यांना माहीत असतात. त्यांना ते सगळ चालतं अन जमतं देखील !!
दुर्दैवाने त्यांच्या याच चमकोगिरी कडे तुमच्या माझ्या सारखी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारी तरुण मुले आकर्षित होतात, अन नेत्यांना ही सगळ्या गोष्टीला कार्यकर्ते हवे असतात.
खरतर तरुण वय हे "लाथ मारिन तिथं डिझेल काढणारं" वय असतं.
या वयात जीवणाची दिशा ठरते, या वयात आपल्या हातात पुस्तके, पेन, लेख, लेखक ,व्याख्यान असायला पाहिजे पण आपण हाती घेतो ते वेवेगळ्या पार्टीचे झेंडे,गमजे, मेळावे, सभा,,, असा सगळा खेळ सुरू होतो. त्याच्या बदल्यात तरुण तडफदार कार्यकर्त्यांना
कधी-मधी धाब्यावर जेवण अन एखादी चपटी आणि कसले तरी नावाला चुटुक मुटुक असं काहीतरी चिटणीस, प्रमुख ,अध्यक्ष,सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष,
सह-शाखाध्यक्ष, पद दिलं जातं. मग तो बनतो युवा नेता (नेता कसला कार्यकर्ताच) बाकी काही नाही .
असले पदं ही त्यांनी ढिगानी तयार करून ठेवलेली
असतात.
मग तो प्रचार असो की अन्य काहीही कार्यक्रम,
साहेब तुम आगे बढो, साहेब अंगार है बाकी सब भंगार है, कोण आला रे कोण आला, गोर गरिबांचा बुलंद आवाज, येऊन येऊन येणार कोण, पासून ते अगदी झिंदाबाद, झिंदाबाद ...,पर्यंत घसा फाटुस्त घोषणा देतो.
त्यातील काही कार्यकर्ते हे गावातील, सरकारी ऑफिस मधील दुबळ्या वर्गावर, वेटर वर, किंवा गरीब लोकांवर नेतेगिरी गाजवतात पण साहेबांच्या सतरंज्या उचलणे, साहेब आल्यावर फटाक्यांची माळ पटवणे, पॉम्प्लेट वाटणे ते अगदी झेंडे लावण्यापर्यंत सगळी कामं करतात.
भरीस भर म्हणून आजच्या जमाण्यात तर सोशल मीडिया सारखं जालीम व्यासपीठ उपलब्ध असल्याने त्यांवर सतत वेगवेगळे उद्योग करतात. अधून-मधून वेगवेगळ्या गटा-तटाची कार्यकर्ते एक-मेकावर तुटून पडतात. बघता काय रागानं पासून सुरवात होते ते अगदी बॉस, किंग, राजा, वादळ, भाऊ चा दरारा, घासून नाही तर ठासून येणार,,,
अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या आभासी दुनियेत रममाण होऊन नाद खुळा होईपर्यंत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतात.
कधी-कधी एक मेकांच्या आई-बहिणीचा उद्धार केला जातो, प्रचंड बॅनरबाजी, नाराजी होते, यावरूनच कधी कधी एकमेकांचे मुडदे पडण्यापर्यंत ही कट्टरता जाते. बऱ्याचदा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना हा आपला कट्टर कार्यकर्ता आहे याची कल्पना देखील नसते.
फक्त कधी-कधी गर्दीत नेत्यांसोबत एक सेल्फी भेटला तरी कार्यकर्त्याना जेवणाची गरज भासत नाही एवढी ऊर्जा त्यांच्या अंगी संचारते.
असं करता करता इकडं जिंदगीच्या कधी पिपाण्या होऊन जातात हे कळत देखील नाही.
मित्रांनो हल्ली पुढाऱ्यांच्या मागे फिरणाऱ्यांची संख्या कमालीची वाढत चालली आहे. पुढारी देखील याला आवर घालत नाहीत कारण तसे करणे म्हणजे मटणाच्या दुकानदाराने शाकाहारी होण्यास सांगण्यासारखे आहे. दुसऱ्या अंगाने विचार केला तर या सगळ्या खेळाला फक्त नेतेच जबाबदार नाहीत त्याला समाज म्हणून तुम्ही आम्ही पण तेवढेच जबाबदार असतो. या उलट नेत्यांना ही एवढ्या सगळ्या लोकांची मर्जी राखणे, मन सांभाळणे,खर्च पेलणे, ऊन - वारा-पावसात रात्रंदिवस प्रवास करणे, सगळ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे, कुटुंबाला वेळ देता न येणे, रोज शेकडो लोकांचे फोन घेणे , शेकडो लोकांना भेटणे, कामे करणे, बऱ्याच गोष्टीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे, प्रतिस्पर्ध्याचा सामना करणे, पक्षश्रेष्टीचा विश्वास संपादन करणे, सतत निवडणुका लढणे, अशी जिकरीची कामं पार पाडावी लागतात. त्यामुळे आपण त्यांनाही ही पूर्णपणे दोष देऊच शकत नाहीत. टाळी नेहमी दोन हाताने वाजत असते.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राजकारण हे काही सगळ्यांचंच करिअर होऊ शकत नाही.
तरी देखील कार्यकर्ता होण्याची खूपच तीव्र इच्छा असेल तर काही सूत्रसंचालक, ड्रायव्हर, अंगरक्षक, सचिव व्हा. कोणतीही कला शिका, अभ्यास करा, भाषणे लिहून द्या. जमलं तर एखाद्या मोठ्या, चांगल्या नेत्या सोबत फिरा. त्यांच्याकडून तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला घ्या. नेता तुमच्या अडी-अडचणीला तुमच्यामागे उभा राहत असेल, तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत असेल, तर फिरण्यात ही अर्थ आहे. नाहीतर सगळी कामं करायला तुम्ही पण तिकीट द्यायच्या वेळी, किंवा काही फायदा व्हायच्या वेळी काही ठराविक लोकांना लाभ भेटणार असेल, नेत्याला त्याच्या नातेवाईक, कुटुंबातील, किंवा ईतर पैश्यावालेच लोकं दिसत असतील तर ताबडतोब मार्ग बदलला पाहिजे.
कधी कधी काही नेते आपल्या भडकाऊ कृतीने, भाषणाने तुम्हा आम्हात, कधी जातीच्या, कधी धर्माच्या तर कधी कशाच्या बहाण्याने भांडणे लावून देत असतील तर दूर रहा. कारण इकडं आपण लगेच जाळपोळ, मारामाऱ्या करत बसतो. तिकडे मात्र दिवसा एकमेकांचे शत्रू असलेले, व्यासपीठावरून एकमेकांवर चिखलफेक करणारे सगळे नेते रात्री एका ताटात जेवायला ही कमी करत नाहीत. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही.
आपण मात्र एक-मेकांचा जीव घ्यायला निघतो. आयुष्यभरासाठी एकमेकांचे वैरी बनतो. कोर्ट कचेरीत अडकतो.
कधी एखाद्या नेत्याचा मुलगा दंगलीत जखमी झालाय किंवा जाळपोळात अडकला आहे असं सहसा होत नाही किंवा अडकला तरी त्यांना वरदहस्त असतो ते लगेच सुटतात देखील.
विचार करा, आपल्या अडी-अडचणीच्या वेळी फक्त कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक असतात.
मित्रानो पूर्वीच्या काळात तरी राजकारण तत्वाचं, निष्ठेचं अन इमानदारीचं होतं, आता ते राहिलं नाही.
अजूनही ही खूप चांगले राजकारणी आहेत पण
अलीकडच्या काळात राजकारणात धूर्त, लबाड लोकांची संख्या वाढतेय.
त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ हा करियर, काम,धंदा,आरोग्य ,कुटुंब या साठी कारणी लावुन, आरोग्य, नाव, पैसा ,इज्जत कमवली तर हेच नेते भविष्यात तुमच्या मागे पुढे ही करतील.
आपल्याकडे एकदा पैसा अडका जमा झाला की भविष्यात देखील तुम्ही निवडणूक लढवू शकता.
काही सामाजिक काम करू शकता आणि नेता ही होऊ शकता.
नाहीतर नेत्याचा मुलगा युवानेता बनतो अन कार्यकर्त्याचा मुलगा युवा कार्यकर्ता !!
नेत्यांच्या हातात झेंडा आहे अन कार्यकर्त्याच्या हातात फक्त दांडा आहे. कधी कधी झेंडा वरच्या वरी बदलला जातो. दांडा अन दांडा धरणारा मात्र तसाच राहतो ही खंत आहे.
त्यामुळे विचार करा, इतरांना आपण मोठं करू शकतो तर आपण का नाही मोठे होऊ शकत ??
फक्त मार्ग बदलावा लागेल.
- चांगदेव गिते