तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

बीडमध्ये एटीएम मशीनच चोरीला, तिघे ताब्यात.


शहरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी नवगण राजुरी येथील एसबीआयचे एटीएम मशीनच फोडून ते टाटा सुमो जीपमध्ये टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेने पाटोदा तालुक्यातील धस पिंपळगावच्या डोंगरातून तीन आरोपी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आणखी तीन ते चार जण फरार आहेत. बीड ग्रामीण पोलीस पहाटे ३ वाजेच्या सुमारास नवगण राजुरी येथील एसबीआयचे एटीएम तपासणीसाठी पोहोचले. मात्र या ठिकाणी एक टाटा सुमो (एम.एच. १२ ई.एन. ५९२७) एटीएम जवळ उभी दिसली. संशय आल्याने पोलिसांनी दूरवरून जीपवर लक्ष केंद्रित केले. तेव्हा त्या जीपच्या स्टेअरिंगवर एक चोरटा तर मागील बाजूस पाच चोरटे एटीएम मशीन आतमध्ये ठेवत असल्याचे दिसले. एटीएम फोडून चोरटे फरार होत असल्याचे चालक रशीद खान यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस जीपने चोरट्यांच्या जीपला डाव्या बाजूने धक्का मारत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र एका चोरट्याने त्याच्याजवळील लोखंडी टॉमी पोलिसांच्या दिशेने फेकून मारत दहशत निर्माण केली. पोलिसांनी त्याही स्थितीत चोरट्यांना पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. मात्र टाटा सुमो जीप व फोडलेले एटीएम मशीन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन चोर फरार झाले. या घटनेची माहिती ग्रामीण ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. आरोपींच्या शोधासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पहाटे उशिरापर्यंत शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांना पाहून चोरटे पळून गेल्यानंतर पोलिसांनी जीपसह चोरट्यांनी फोडलेले एटीएम मशीन तसेच छोटे सिलिंडर, एक गॅस कटर, पाईप, तीन बॅटरी, हातोडा, गल्लोर, पाने, हॅन्डग्लोज व चोरट्याचा एक शर्ट घटनास्थळावरून ताब्यात घेतला.

No comments:

Post a Comment