तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

भूस्खलनाचा धोका, ४० कुटुंबांचे स्थलांतर.


संगमेश्वर - भूस्खलनाचा धोका असल्याने नजीकच्या कोळंबे आंबेकरवाडीतील ४० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. कोळंबेसह सोनगिरीला काल पडलेल्या मुसळधार पावसाने जोरदार झटका दिला असून अनेक ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. दरड कोसळल्याने कोळंबे-कोसुंब रस्ता काल बंद होता.सोनगिरी टाकळेवाडी येथील रामचंद्र शिंदे यांच्या घरावर दरड कोसळली आहे. याच वाडीतील अरुणा गोरे यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. कोळंबे आंबेकरवाडीतील पंडित यांच्या घराला लागून असलेला बांध त्यांच्या भिंतीवर कोसळला. यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण वाडीलाच २०११ पासून धोका असून येथील ४० कुटुंबांना तात्पुरत्या स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या सर्वांची सोय कोळंबे गुरुकुल वसतिगृह येथे करण्यात आली आहे. कोळंबे विद्याप्रसारक मंडळाने या सर्वांच्या जेवणाची सोय केली असून अध्यक्ष नयन मुळ्ये, राजाभाऊ मुळ्ये, उदय मुळ्ये, अधीक्षक जुवेकर यांचे सहकार्य लाभत आहे.कोळंबे पडवळवाडी येथील सुहास पडवळ यांच्या घराचा बांध कोसळल्यामुळे त्यांच्यासह आजूबाजूच्या चार घरांना धोका निर्माण झाला आहे. या चारही कुटुंबांची वस्तीची व्यवस्था वाडीतील समाजमंदिर सभागृहात करण्यात आली आहे. २०११ पासून कोळंबेत जमिनीला भेगा पडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे पावसाआधी या भागातील ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येते. ग्रामस्थ अशा स्थलांतराला वैतागले असून प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाय काढावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment