तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

खासगी बसचालकांना शिवसेनेचा दणका.


देवरुख - भरमसाट तिकीट आकारणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल्सना साखरप्यात शिवसैनिकांनी चांगलाच धडा शिकवला. पंचायत समिती सदस्य व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी खासगी बस ट्रॅव्हल्स अडवून हंगामा केला. शेवटी जादा आकारण्यात आलेले पैसे प्रवाशांना परत करण्याची वेळ या ट्रॅव्हल्सवाल्यांवर आली.खासगी बस ट्रॅव्हल्स मालक मनाला वाटेल तसे तिकीट दर वाढवून मनमानी करतात. साखरपा परिसरातून मुंबई व अन्य ठिकाणी जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची संख्या जास्त आहे. काही टॅव्हल्सकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याचबरोबर तिकीट दरही भरमसाट असतात. या मनमानी विरोधात पंचायत समिती सदस्य जया माने यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ एकत्रित झाले आहेत. एक महिन्यापूर्वी साखरपा पंचक्रोशी प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. या वेळी संघटना व ट्रॅव्हल्स मालक यांच्यात बैठकही झाली होती. या बैठकीत तिकीट दर निश्चित करण्यात आले होते.यापुढे जादा दर आकारले तर साखरप्यातून एकही बस जाऊ देणार नाही, असा इशारा या वेळी शिवसैनिकांनी दिला. या वेळी जया माने यांच्यासह उपतालुकाप्रमुख काका कोलते, साखरपा सरपंच विजय पाटोळे, भडकंबा सरपंच शेखर आक्टे, कमलेश म्हावलणकर, दीपक गोवरे, राजाभाऊ वाघधरे, दत्ता वाघधरे, सुरेश कटम, मयू सावंत, विजय पाष्टे, कृष्णा सकपाळ, काशीनाथ सकपाळ, महेंद्र फोडे, प्रकाश रेवाळे,सुधीर देवळेकर आदी उपस्थित होते.

अखेर जादा आकारलेली रक्कम परत करावी लागली....

काही ट्रॅव्हल्स भरमसाट तिकीट दर आकारत होती. ही गोष्ट जया माने यांना समजली. सोमवारी जया माने यांनी शिवसैनिकांना घेऊन कोंडगाव तिठ्य़ात या बस अडविल्या व प्रवाशांबरोबर संवाद साधला. या वेळी प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे २०० ते ३०० रुपये जास्त दर आकारला गेला होता. या वेळी शिवसैनिकांनी गोंधळ घातला व या बस तिथेच थांबवून ठेवल्या. जोपर्यंत ज्यादा आकारलेले पैसे परत देत नाहीत तोपर्यंत या बस न सोडण्याचा निर्णय घेत आक्रमक पवित्रा घेतला. शेवटी जवळपास ८० प्रवाशांना जादा आकारलेली रक्कम परत करण्यास या ट्रॅव्हल्सवाल्यांना भाग पाडले.

No comments:

Post a Comment