तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 July 2018

ना. पंकजाताई मुंडे यांनी सुरू केली बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

राज्यातील ३०२ ग्रामपंचायतींना मिळणार नवीन दुमजली इमारत ; बीड जिल्हयात ६४ तर परळी मतदारसंघातील १७ ग्रामपंचायतीचा होणार कायापालट

मुंबई  दि.०५ ----- एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील ३०२  गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा महत्वपूर्ण  निर्णय राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई यांनी घेतला आहे. ग्रामविकास  खात्यामार्फत ही योजना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेतंर्गत बीड जिल्हयातील सर्वाधिक ६४ ग्रामपंचायतीचा कायापालट होणार असून त्यात परळी मतदारसंघातील १७  ग्रामपंचायतींला स्वतःची दुमजली प्रशस्त इमारत मिळणार आहे.

    राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रा. पं. ना इमारत बांधून देण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता आणि स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी ही योजना आखली आहे. एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या गावांत ग्रामपंचायत कार्यालयाची स्वतःची स्वतंत्र इमारत नाही  अशा राज्यातील ३०२ ग्रामपंचायतींना  पहिल्या टप्प्यात इमारत बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली आहे, त्यासाठी प्रत्येकी बारा लाख रुपये इतका निधी मिळणार आहे, यातील नव्वद टक्के रक्कम ग्रामविकास विभाग तर दहा टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने स्वनिधीतून द्यावयाची आहे.

अशी असणार नवीन इमारत
---------------------------------
राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या आराखड्यानुसार बांधण्यात येणारी नवीन इमारत दुमजली असून त्याचे क्षेत्रफळ ७७.१९ चौमी म्हणजेच ८३९.१७ चौरस फूट असणार आहे. यामध्ये जनसुविधा केद्राबरोबरच तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व ग्रामीण स्तरावरील शासकीय कर्मचारी यांना बसण्याची व्यवस्था तसेच मिटींग हाॅल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणार आहेत. ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांची देवाण घेवाण करण्यासाठी स्वतंत्र खिडक्या देखील यात असणार आहेत.

बीड जिल्हयातील ६४ ग्रामपंचायती
-----------------------------------
ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी निवडलेल्या राज्यातील ३०२ ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक ६४ ग्रामपंचायती हया बीड जिल्हयातील आहेत. परळी मतदारसंघातील राडी तांडा, चंदनवाडी, वाकडी, दगडवाडी, दत्तपुर, हनुमंतवाडी,चोथेवाडी,ममदापुर (परळी) औरंगपूर,भोजनकवाडी, चांदापुर, बोरखेड, गुट्टेवाडी, जळगव्हाण, मलनाथपूर, ममदापुर, तपोवन या १७  ग्रामपंचायतीला नवीन इमारत मिळणार आहे. तालुक्यातील गावांमध्ये बांधण्यात येणा-या इमारती पुढीलप्रमाणे बीड-१०, गेवराई-०८, अंबाजोगाई-०८, आष्टी-०८,केज-०७, माजलगाव-०२, पाटोदा-०७, परळी-०९, धारूर-०३, शिरूर कासार-०१, वडवणी-०१

   या योजनेंतर्गत राज्यातील अन्य जिल्हयातील गावांना बांधण्यात येणा-या इमारती.. पुणे-२५, सातारा- ३,सांगली-४, कोल्हापूर-१७,सोलापूर-२,औरंगाबाद-११, नांदेड-१८,हिंगोली-७, उस्मानाबाद- ४,   जालना-९ ,परभणी -९, बुलढाणा-१६, यवतमाळ-१२, चंद्रपूर-६, गडचिरोली-३, नागपूर -६, अकोला-७, वाशीम-३, अमरावती-२, गोंदिया -१,लातूर-५, नाशिक-१३, धुळे-३, जळगाव-१६, नगर-२०, सिंधुदुर्ग-१, रायगड-१२, रत्नागिरी-२ आणि पालघर एक ठिकाणी  ग्रामपंचायत कार्यालय बांधली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment