तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

गुहेमध्ये बेपत्ता झालेला फुटबॉल संघ नऊ दिवसांनी सापडला जिवंत.


मागच्या नऊ दिवसांपासून थायलंडच्या गुहेमध्ये बेपत्ता झालेला युवा फुटबॉलपटूंचा संपूर्ण संघ जिवंत सापडला आहे. बचाव पथकातील सदस्य अडकलेल्या मुलांपर्यंत पोहोचले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकूण १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेमध्ये अडकले आहेत. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांना अखेर सोमवारी यश आले.थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत थायलंडची ज्युनिअर फुटबॉल टीम बेपत्ता झाली होती. पाऊस आणि चिखलामुळे शोध मोहिमेत खूप अडचणी येत होत्या. गुहेच्या प्रवेशद्वारावर खेळाडूंच्या सायकल, शूज आणि काही इतर वस्तू सापडल्या होत्या.
थायलंडच्या वाईल्ड बोअर फुटबॉल टीम मधील ही मुले ११ ते १६ वयोगटातील आहेत. २३ जूनला शनिवारी हा संघ फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडला होता. त्यावेळी थांम लुआंग नांग नोन गुहा पाहण्यासाठी म्हणून ही मुले आतमध्ये गेली. त्याचवेळी अचानक बाहेर पावसाचा जोर वाढला आणि बाहेर येण्याचा रस्ता बंद झाला. त्यामुळे मुले आतच अडकून पडली.या संपूर्ण संघाला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत घेण्यात आली आहे. थायलंडच्या नेव्ही सीलच्या पथकाबरोबर अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमधील तज्ञही या मुलांना शोधून काढण्यासाठी मेहनत घेत होते. ही मोहिम अजून संपलेली नाही. गुहेमध्ये पाणी आहे. हे पाणी काढल्यानंतर १३ जणांना बाहेर काढण्यात येईल. मुलांच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि नर्सेसना आत कसे पाठवता येईल याचा आम्ही विचार करत आहोत असे बचाव मोहिमेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment