तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

राष्ट्रवादीकडून संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी.


विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दागाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधीमंडळ परिसरात दाखल झाले. संभाजी भिडे यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 'संभाजी भिडे यांच्या विरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना आतापर्यंत अटक व्हायला हवी होती. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. मनुस्मृती ही पहिली राज्यघटना होती, असं संभाजी भिडे म्हणतात. आम्हाला मिळालेले अधिकार हे मनूनं दिले आहेत की संविधानानं दिले आहेत, हे सरकारला विचारण्यासाठी मी या वेशभूषेत आलो आहे,' असं प्रकाश गजभिये यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. राज्य सरकार लोकांना न्याय देण्यात कमी पडत असल्याची टीका यावेळी गजभिये यांनी केली. 'फडणवीस सरकार राज्यातील जनतेला न्याय देण्यात कमी पडतं आहे. या आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या सरकारला जाग करायला आम्ही आलो आहोत,' असंही ते पुढे म्हणाले. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन होत आहे.

No comments:

Post a Comment