तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

टंचाईसदृश्य स्थितीला बदलवण्यासाठी व्यापक उपायात्मक कामे करण्याचे निर्देश येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यात 5 हजार शेततळे करावेत – विभागीय

आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर
शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

मराठवाड्यात या वर्षीही गरजेइतका पाऊस झाला नसल्याने टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि प्रत्येक ग्रामस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहत असून या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे. टंचाईला कायमस्वरूपी दूर करणारी मागेल त्याला शेततळे सारख्या उपयुक्त योजनेत विभागाने राज्यात चांगले काम केलेले असून येत्या दोन महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने पाच हजार शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेऊन सर्वांनी अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्क डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी आज येथे दिले.

टंचाईसदृश्य परिस्थिती नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे  आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी संबंधित यंत्रणांना विविध निर्देश दिले. व्यासपीठावर यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, साधना सावरकर, डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर, पारस बोथरा,सहाय्यक आयुक्त कुंभार यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी कृषी विभाग हा टंचाईसदृश्य परिस्थितीत शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणारा, पर्यायी व्यवस्था उभी करणारा महत्वाचा विभाग असून या विभागामार्फत मागेल त्याला शेततळे या योजनेत 9100 लक्षांक इतके उद्दिष्ट दिलेले असताना 10225 कामे हाती घेतली तर 9984 इतकी म्हणजे हाती घेतलेल्या कामांप्रमाणे 98 टक्के कामे पूर्ण केली आहेत. ही निश्चितच चांगली बाब असून याच पद्धतीने अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांना शेततळे करून द्यावे, पूढील दोन महिन्यात पाच हजार शेततळे नव्याने पूर्ण करावयाचे असून शेततळ्याच्या, जलयुक्तच्या माध्यमातून प्रत्येक गाव हे पाणीदार करावयाचे आहे. पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीने तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयाने नियोजनपूर्वक ही कामे यशस्वी करण्याचे निर्देश डॉ. भापकर यांनी यावेळी दिले.

टंचाई सदृश्य परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक सक्रीय होऊन गुणवत्तापूर्ण, टंचाई परिस्थितीला दूर करणारी नाविन्यपूर्ण कामे करावीत. मनरेगा अंतर्गत कंपार्टमेंट बंडींगची कामे अधिक संख्येने करावीत. ही कामे शेती, शेतकरी, जलसंधारणाच्या दृष्टीने उपयुक्त, पूरक ठरणारी असून गाळमुक्त धरण गाळयुक्त शेती, योजनेतून गाळ काढण्याची कामे अधिक प्रमाणात करावीत. हे करताना सरपंच, गावकरी, यंत्रणा यांनी परस्पर समन्वयातून प्रत्येक गावातील प्रत्येक वॉटरबॉडी स्वच्छ  करण्याच्या दृष्टीने गाळ उपसा करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, आरोग्य, जलसंधारणाच्या विविध उपयुक्त योजना अधिक व्यापक प्रमाणात पोहचवण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी सक्रीय व्हावे, अशा सूचना देऊन डॉ. भापकर यांनी जिल्ह्यातील पशुधनाची, जनावरांची योग्य निगा राखणे त्यांना या टंचाईच्या स्थितीत आवश्यक चारा – पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची, संबंधित यंत्रणेची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील पशुधनाच्या संरक्षण, चारापाणी व्यवस्थेचे योग्य आणि परिपूर्ण नियोजन पशुसंवर्धन कृषी, संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने पुरवण्याचे निर्देश डॉ. भापकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी तालुकानिहाय सर्व विभागांच्या योजनांचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील प्रत्येक योजनानिहाय मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होण्या सोबतच प्रत्येक मजूराला प्रत्येक ग्रा. पंचायती व इतर यंत्रणांनी कामे उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे सांगून ग्रामीण घरकुल योजनेची सर्व तालुक्यातील सर्व कामे डिसेंबर अखेर पूर्ण करावीत. यासंदर्भात प्रत्येक आठवड्याला गटविकास अधिकारी यांनी आढावा घ्यावा गावागावांमध्ये जाऊन कामांचे नियोजन करून कामे सुरू करावीत. जलयुक्तच्या कामांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांनी 2017-18 ची सर्व कामे डिसेंबर अखेर पूर्ण करावीत. पूर्ण झालेल्या सर्व कामांचे जिओ टॅगींग करणे आवश्यक असून तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणी चारा याचे 15 जूलै पर्यंत पूरेल अशा पद्धतीचे अचूक नियोजन करावे. तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेऊन कोणत्या भागात पूरेसा चारा उपलब्ध आहे आणि कोणत्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता जाणवू शकते हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने चारा आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे शक्य होईल, यादृष्टीने प्रभावी वितरण व्यवस्थेचे नियोजन तालुका, जिल्हा आणि विभाग यांची गरज लक्षात ठेऊन व्यापक नियोजन करण्यासंदर्भात जिल्हाधिकरी, विभागीय आयुक्त यांनी यावेळी विविध सूचना दिल्या.

जिल्ह्यातील तालुकानिहाय गावांमध्ये मागेल त्याला शेततळे, गाळयुक्त शेती, गट शेती, घरकुल योजना, दलितवस्ती सुधार योजना, पेयजल योजना, स्वच्छता अभियान, मनरेगा, रेशीम लागवड, जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठा या विविध योजनांचा विस्तृत आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पुरवठा अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आरोग्य , पाणीपुरवठा, लघुसिंचन, जिल्हा परिषद, जलसंधारण, वनविभाग, या व इतर संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होत.

 

No comments:

Post a Comment