तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर विशेष लक्ष घालू - रामदास आठवले

नाशिक (उत्तम गिते)

देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आणि शिष्यवृत्तीसाठी आम्ही कटिबद्ध असून शिक्षणाच्या आणि शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर विशेष लक्ष घालू असे आश्वासन देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिले. लासलगाव येथील महावीर महाविद्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, भाजपचे सुरेश बाबा पाटील,आमदार किशोर दराडे, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंढरीनाथ थोरे, अजय ब्रम्हेचा, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकर, नेमिनाथ जैन, शिवसेनेचे सुनील पाटील, सरपंच संगीता शेजवळ, संस्थेचे अध्यक्ष सुनील अब्बड, महावीर चोपडा, कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, संतोष ब्रम्हेचा,मोहनलाल बगडीया,पारसमल साखला, रतन राका, प्राचार्य डुंगरवाल, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, शिवा पाटील सुराशे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माजी सरपंच कुसुमताई होळकर, आरपीआयचे शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ आदी उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यामुळे आज देशात इंदिरा गांधी सारख्या महिला पंतप्रधान होऊ शकल्या. महात्मा फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानले त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी दलित मागासवर्गीय समाजाला गावाच्या वेशीच्या आत आणण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मी कुठल्याही पक्षा सोबत असलो तरी छगन भुजबळ हे माझे जवळचे मित्र आहे. महात्मा फुले यांच्या कार्याचा वसा छगन भुजबळ यांनी घेतला असून बहुजन समाजासाठी त्यांचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे गौरोदगार त्यांनी काढले. आगामी निवडणुकी बाबत बोलतांना ते म्हणाले की,  २०१९ ची मॅच जिंकण्यासाठी आमचा सराव सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि मी चांगला फलंदाजी करतो फलंदाजी करतांना आम्ही नेहमीच चौकार आणि षटकार लगावत असल्याची मिश्किलपणे टिपणी केली. यावर छगन भुजबळ यांनी आमच्याकडे चांगले गोलंदाज असून आम्ही चांगले गडी बाद करू शकतो अशी टिपणी केल्याने आठवले आणि भुजबळ यांच्यात चांगलीच जुगलबंदी जमली होती. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्वांना शिक्षणाची कवाडे खुली केली. त्यांचा हा कार्यक्रम आणि विचार शाहू महाराज यांनी सुरू ठेवले त्यानंतर महात्मा फुले यांना गुरू मानले आणि देशातील युवकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सद्या देशात आरक्षण कमी करण्याचा सरकारचा डाव आहे का ? असा सवाल उपस्थित करून  आयआयटी मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. तसेच देशातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कमी होत असल्याने अनेक गोरगरिबांची मुले आज शिक्षणापासून वंचित राहत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कमी होणार नाही याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सर्वांसाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. समाजाचे हित जपले जाईल व कुटूंबाचे रक्षण होईल असे शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना करून शिक्षणातून सुशिक्षित आणि सुसंस्कृत विद्यार्थी निर्माण व्हावे असे त्यांनी सांगितले. सद्या सरकारकडून शिक्षणाच्या बाबतीत रोज नवनवीन पत्रके काढले जात आहे.त्यामुळे शिक्षकांना कामाचा अधिक ताण निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे देखील शासनाने लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.प्रफुल्ल साबद्रा यांच्या सारखे तज्ञ डॉक्टर या महाविद्यालयाच्या माध्यमातून पुढे आले आणि जागतिक स्थरावर त्यांनी आपले नावलौकिक मिळविले. त्याबद्दल त्यांनी सर्व संस्था व शिक्षकांचे कौतूक केले.

No comments:

Post a Comment