तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

मराठवाड्याचे गांधी अशी ओळख असलेले गंगाप्रसाद अग्रवाल काळाच्या पडद्याआड


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सर्वोदयी नेते, समाजवादी विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल (९६) यांचे वृध्दापकाळाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राहत्या घरी बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी पाऊणे दोन वाजता निधन झाले. अग्रवाल यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वास्तव्यास असलेले गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म ७ जानेवारी १९२३ मध्ये झाला. अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात मॅट्रीक तर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयात कॉमर्स इंटरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. या दरम्यानच १९४२ च्या चले जाव आंदोलनात भाग घेऊन स्वातत्र्य लढ्यात अग्रवाल यांनी उडी घेतली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी देखील त्यांनी लढा दिला. वसमत येथील झेंडा सत्यागृह, आजेगावचा संघर्ष, जंगल सत्यागृह या आंदोलनाचे अग्रवाल यांनी नेतृत्व केले.
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचाराने प्रेरित होऊन भुदान चळवळीतही त्यांनी सहभाग नोंदविला. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीच्या स्वप्नातील ग्रामस्वराज व ग्रामविकासासाठी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. १९६२ व १९६५ मध्ये झालेल्या युध्दाच्या वेळी शांती सेनेसाठी कार्य करुन निर्वासीतांच्या छावणीमध्ये मदतकार्य करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
आणिबाणीच्या वेळी त्यांना अटक झाली होती. अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र खादी व ग्रामउद्योग मंडळाचे अध्यक्ष, वसमतचे नगराध्यक्ष आदी पदे त्यांनी भुषविली आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातुन शेतकरी व विणकरांसाठी त्यांनी कार्य केले. बाळासाहेब भारदे पुरस्कार, मराठवाडा भुषण पुरस्कार यासह वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. उद्या १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वसमत येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment