तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

आमचे काम चांगले असल्याचे ग्रामविकास मंत्र्यांनाही मान्य - ना.धनंजय मुंडेयशवंत पंचायत राज पुरस्कारावरून धनंजय मुंडेंची कोपरखळी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  वरती सरकार कोणाचेही असो, एकदा आम्हाला संधी मिळाली कि आम्ही अतिशय चांगलं काम करतो हे ग्राम विकास मंत्र्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळेच आमच्या ताब्यातील अंबाजोगाई आणि परळी पंचायत समितीला यशवंत राज पंचायत पुरस्कार मिळाले अशी शाब्दिक कोपरखळी ना. धनंजय मुंडे यांनी मारली. अंबाजोगाई येथील देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

२०१६-१७ सालासाठीचा प्रथम क्रमांकाचा यशवंत पंचायत राज पुरस्कार अंबाजोगाई तर द्वितीय परळी पंचायत समितीला मिळाला आहे. या दोन्ही पंचायत समिती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ना. पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याचे पुरस्कार धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील पंचायत समित्यांनी पटकावले अशी चर्चा जोर धरू लागली. मात्र सदरील पुरस्कार हा २०१६-१७ सालासाठी असून त्यावेळेस दोन्ही पंचायत समित्या भाजपकडेच होत्या असे जोरदार प्रत्युत्तर ना. पंकजा मुंडे यांच्या बाजूने देण्यात आले. तर, पुरस्कार जरी २०१६-१७ साठी असले तरी त्यासाठी पंचायत समित्यांची तपासणी मात्र यावर्षी मार्च मध्ये करण्यात आली होती आणि आताचे सुरळीत कामकाज पाहूनच अंबाजोगाई आणि परळी पं.स.ला पुरस्कार मिळाले असा दावा धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केला आहे. एकंदरीत पुरस्कारावरून मुंडे बहिण-भावांच्या समर्थकात जोरदार वाद-प्रतिवाद सुरु होते. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आम्हाला संधी मिळाली कि आम्ही अतिशय चांगलं काम करतो हे ग्राम विकास मंत्र्यांनीही आम्हाला पुरस्कार देऊन मान्य केले असल्याचे टिप्पणी केली.

पुढे बोलताना ना. मुंडे यांनी आगामी आठ महिन्यांचा काळ जिकिरीचा असून १९७२ च्या दुष्काळापेक्षाही वाईट परिस्थिती येईल असे नमूद केले. यंदा पाऊस नाही, खरीपाचे पिक हातातून गेले, रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत तर उसाला हुमणीने ग्रासले आहे. भीषण पाणी टंचाई होणार असून त्यासाठीच्या उपापयोजना आतापासूनच अमलात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून आर्थिक संस्थांनी त्यांना सहकार्य करावा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment