तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

‘क्या कहेंगे लोग ये सबसे बडा रोग’! - युवा उद्योजक सचिन चिद्रवार

जिल्हा परिषद शाळेचा नवराञ महोत्सव : असा मी घडलो!

जिंतूर  :
                         आपल्या विद्यार्थी जीवनात सातत्याने घडत असणारी गोष्ट म्हणजे ‘बदल’ आणि या बदलानुसार जे स्वतःमध्ये बदल घडवतात तेच यशस्वी होतात हा ‘निसर्गाचा नियम’. ज्यांनी काळाप्रमाणे स्वतःला बदलले नाही ते संपुष्टात आले, हा इतिहास. साक्षरता एवढी वाढली आहे की, पदवी घेऊन बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढत आहे व आपल्याकडे असलेल्या शासकीय आणि खासगी नोकर्‍यांची संख्या कमी होत आहे, असे प्रतिपादन जिंतूर शहरातील युवा उद्योजक सचिन चिद्रवार यांनी केले.
       नवराञ महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी यांच्या 'असा मी घडलो!' उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सचिन चिद्रवार बोलत होते.कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के.सी.घुगे होते.
           सचिन चिद्रवार पुढे बोलतांना म्हणाले, आपली व्यवस्था इतक्या सर्वांना नोकर्‍या देऊ शकत नाही म्हणून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आपण वर्तमानपत्रातून वाचले असेलच की, सरकारी नोकर्‍या कमी होणार आहेत, खासगी कंपन्या यांत्रिकीकरण व ऑटोमेशनवर भर देत आहेत, त्यामुळे नोकर्‍यांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा आता नोकरी देणारे बनण्याची गरज आहे. वरील सर्व प्रश्‍नांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे ‘उद्योजक’ बनणे. तरुणांना उद्योजक बना, असे सांगितले की, त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, उद्योजक बनणे एवढे सोपे आहे का? त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते मोठ्या कंपनीचे चित्र, मोठी जागा, शेड, धुराडे, भोंगा व भरगच्च कामगार. दुसरा विचार सुरू होतो त्यासाठी लागणारी गुंतवणूक, भांडवल, अनुभवी तज्ज्ञ मनुष्यबळ उभे करायचे कुठून? तिसरा विचार असतो माझा उद्योग यशस्वी होईल का? जर अपयश आले तर लोक काय म्हणतील? ‘क्या कहेंगे लोग ये सबसे बडा रोग’ यापासून स्वतःला दूर ठेवा व आत्मविश्वासाने सामोरे जा.
      उपक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागासह सहशिक्षक नामदेव चव्हाण, राजेश सातपुते, देवानंद सावंत, श्रीमती संगीता चौधरी, अल्का खिल्लारे, सुनंदा जाधव व कु.मंगल घोळवे विद्यार्थी नवनाथ घोगरे,पुरुषोत्तम राऊत,विशाल पालवे,मयुरी कामिटे,अभिषेक बुधवंत,रेणुका राऊत व प्रतीक बुधवंत आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment