तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 October 2018

युवक, मित्र व कार्यकर्त्यांनो, विचार करा, मेंदूला तान द्या....

╭ ▌ बॉटम लाईन  ▌╮
  'सुभाष मुळे' गेवराई
---------------------------
आज जर आपण विचार केला तर, महाराष्ट्रातील राजकारणी घराण्याची दुसरी, तिसरी पीढी राजकारणात येत आहे. राज ठाकरेंचा मुलगा असो किंवा अजित दादांचा मुलगा पार्थ असो, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे असो किंवा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा डॉ. सुजय विखे असो, की सुनिल तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे असो... असे एक ना अनेक उदाहरण देता येतील.
         यामध्ये जरा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल. की गेल्या कित्येक वर्षात एक बच्चू भाऊ कडू सोडता महाराष्ट्रात सर्वसामान्य कुटूंबातून एकही नेतृत्व पुढे आलेलं नाही. का झाले असे..? तिकडे गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी सारखा तरुण पंतप्रधानांच्या मतदार संघात निवडून येतो. पंचवीशी देखील पार न केलेला तरुण पाटीदार समाजाचा नेता बनतो (हार्दिक पटेल). बिहारचा राहणारा असणारा कन्हैय्या कुमार दिल्लीत शिक्षण घेऊन मोदींच्या धोरणां विरोधात दंड थोपाटतो आणि एक विद्यार्थी नेता म्हणून पुढे येतो. असे एक ना अनेक उदाहरण देता येतील. मात्र महाराष्ट्राचे काय..? किती नेते गेल्या दशकात सर्व सामान्य कुटूंबातून वर आले..? मला असं वाटतं यात लोकशाहीची पर्यायानं जनतेची हार तर आहेच. मात्र जनतेला याची जाणीव कधी होणार? आपल्यावर राजकीय नेत्यांची मुलं किती दिवस लादली जाणार..? सर्वसामान्य जनतेतून गेल्या कित्येक वर्षातून एकही नेतृत्व समोर आलेले नाही. या महारष्ट्रात सर्वसामान्य जनतेतून एखादा विद्यार्थी नेता का उदयास येत नाही, की त्याला राजकारणात येऊ दिलं जात नाही, की असं वातावरण तयार झाले आहे की, राजकारण फक्त आमदार -खासदारांच्या मुलांसाठीच असतं...? जरा विचार करा बिहारचा कन्हैया कुमार आज महाराष्ट्र भर आपल्या तरुणां समोर भाषण करत तरुणांची मन जिंकत आहे. अशा वेळेला आपल्या तरुणांच्या मनात हे का येत नाही, आपणही राजकारणात यावे. जातीच्या आरक्षणाच्या आंदोलनात मी पाहिले आहे की, कित्येक तरुण अशी आहेत... ज्यांची भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाली. या तरुणांची भाषण का व्हायरल झाली..? कारण त्या तरुणांचे विचार समाजाला पटत होते ना.
      आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की, कार्यकर्त्याचा पोरगा आमदाराच्या पोराचा कार्यकर्ता झाला आहे, कधी तरी या पोरानं विचार करायला पाहिजे. नेता कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होतो. म्हणजे तुमचा बाप जर कार्यकर्ता असेल तर त्याच्या जीवावर नेता मोठा होतो. या नेत्याच्या मागं पुढं करत आपला बाप कार्यकर्ता झाला आणि कार्यकर्ता म्हणूनच मरणार आहे. मात्र, तुम्ही हा निश्चय करायला हवा, मी कार्यकर्ता म्हणून मरणार नाही तर नेता म्हणून मरणार..विचार करा ,मेंदूला तान द्या. नाहीतर ...?

╭ ▌ बॉटम लाईन  ▌╮
  'सुभाष मुळे' गेवराई
---------------------------

1 comment: