तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 November 2018

सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा.


सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. हे शपथपत्र म्हणजे, भाजपाचे षडयंत्र असल्याची टीका विरोधकांनी करताच, आता दोन प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल न्यायालयात आहे. आणखी २०० प्रकरणांची चौकशी बाकी असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

एसीबीने शपथपत्रात अजित पवार यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवून सिंचन घोटाळ्यास त्यांना जबाबदार धरले आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना, शपथपत्र सादर करण्यासाठी एसीबीने ‘हीच’ वेळ साधल्याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. विधिमंडळात याचे पडसाद उमटले नाहीत. मात्र, सभागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या कारवाईवर शंका व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, निवडणुका तोंडावर येताच, विरोधी पक्षाच्या नेत्याविषयी संशय निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. अजित पवार यांचा यात सहभाग नाही. ते न्यायालयीन लढाई लढतीलच, पण एसीबीचे शपथपत्र लगेच माध्यमांकडे कसे पोहोचले?
गिरीश महाजन म्हणाले, या चौकशीत सरकारचा हस्तक्षेप नाही. प्रकल्पांना मंजुरी देताना प्रक्रिया नियमानुसार पार पाडली नाही. त्यामुळे आक्षेप घेणे चुकीचे आहे. या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? असे विचारता, हा विषय सरकारपुढे नाही, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment