तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

जलयुक्त शिवार अभियान पत्रकारिता पुरस्कारासाठी दि. 15 फेब्रुवारी पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


         औरंगाबाद, दि.30 (जिमाका) :-- जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टिने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत योजनेच्या कामाला व्यापक  प्रसिध्दी देऊन या  योजनेत लोकसहभाग वाढवणाऱ्या  पत्रकारांसाठी शासनामार्फत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात. औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका दि. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पाठवाव्यात, असे आवाहन जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात येत आहे.सन 2017 आणि सन 2018 या वर्षातील पुरस्कारांसाठी सदर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
    राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभाग स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात  येतो. तसेच राज्यस्तरावर इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधींना एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.  प्रवेशिकेचा विहित नमुना जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद येथे उपलब्ध असून तसेच अधिक माहितीसाठी ग्रामविकास ज जलसंधारण विभागाचा दि. 09.08.2017 आणि 28.09.2016 चा शासन निर्णय पहावा.
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीच्या दि. 1 जानेवारी 2017 ते दि. 31 डिसेंबर 2017 (सन 2017 चा पुरस्कार) तसेच   आणि 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण (सन 2018 चा पुरस्कार) याच्या पात्रतेकरिता मूल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, ब, क वर्गवारीतील वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.
        एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जर एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबंधित संपादकांनी त्याचा अर्ज पुरस्कार योजनेसाठी पुढे सादर करावा. वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेले असेल तर त्या संबंधिचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकांनी निवड समितीकडे सादर करावा.पुरस्कारासाठी गठित निवड समितीतील सदस्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीयस्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल. अर्जदारांनी विहित नमुन्यातील आपला अर्ज तीन प्रतीमध्ये संबंधित जिल्हास्तर समितीकडे विहित मुदतीत पाठवावा. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मुळ लिखाणाची कात्रणे त्याच्या दोन प्रतीसह पाठवावी लागतील. मुळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालीकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालीकाच्या संपादकाचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका  जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, खडकेश्वर, औरंगाबाद, पिन 431001 (दूरध्वनी क्र. 0240-2331285) यांचेकडे दि. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीतर्फे जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

No comments:

Post a comment