तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 January 2019

बीड जिल्हयात चार वर्षात आणला २५ हजार कोटीचा निधी - ना. पंकजाताई मुंडे


लोकनेत्याच्या पुण्याईने जिल्हा प्रगतीपथावर ; विरोधकांकडे आरोप करण्यासाठी मुद्दाच शिल्लक नाही

धारूर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे झाले थाटात लोकार्पण

धारूर (प्रतिनिधी) :- दि. ०५ ------- पुर्वीचे सत्ताधारी दोन लाखाच्या निधीसाठी दोन कोटी चकरा मारायला लावायचे परंतु ही परिस्थिती आम्ही सत्तेत आल्यानंतर बदलली. आता जिल्हयात विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचा २५ हजार कोटीचा निधी आम्ही आणला असून विविध विकास कामे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अर्थात ही सर्व पुण्याई लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले. जिल्हयाच्या इतिहासात कधी नव्हे तो एवढा मोठा निधी आणल्याने विरोधकांना सुध्दा टीका करण्यासाठी मुद्दा शिल्लक नसल्याचे त्यांनी म्हटले.

   धारूर नगरपरिषदेच्या एक कोटी २० लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे  लोकार्पण ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, मोहनराव जगताप, राजाभाऊ मुंडे, सहाल चाऊस आदी उपस्थित होते.

   पुर्वी लातूर, नांदेडच्या नेत्यांनी  राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले होते, त्यांनी त्याकाळी या दोन जिल्हयासाठी जेवढा निधी आणला त्यापेक्षा शंभर पट जास्त निधी आपण बीड जिल्हयासाठी आणला असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, जलयुक्त शिवार बरोबरच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, २५१५ आदी विविध योजनांच्या माध्यमातून २५ हजार कोटीचा निधी आम्ही आणला. केवळ निधी देवून आम्ही थांबलो नाही तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले. ग्रामीण महाराष्ट्र बेघरमुक्त करण्यासाठी प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सन २०१० पुर्वीची अतिक्रमणे नियमित करून एकही माणूस घर मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. घराबरोबरच उज्ज्वला गॅस, सौभाग्य योजनाही सरकारने राबविल्या असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्हा सर्वात पुढे
-------------------------
पोषण, आरोग्य, आयुष्मान भारत, स्त्री जन्मदर, जलयुक्त शिवार, पीक विमा  या सर्वच बाबतीत आपला जिल्हा राज्यात सर्वात पुढे राहिला आहे. मागासलेपणाची ओळख आता हळूहळू पुसली जावून आपली वाटचाल प्रगतीकडे होत आहे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यापुढे शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तीन गोष्टीवर आपण जास्त काम करणार असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. एवढा निधी आणल्याने विरोधकही 'आ' वासून पहात आहेत, आता कोणता आरोप करावा हा प्रश्न त्यांना पडला असल्याचे त्या म्हणाल्या.

   धारूर तालुक्याला या अगोदर तुटपुंजा निधी मिळायचा पण पालकमंत्री म्हणून आपण विविध योजनांच्या माध्यमातून ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे त्या म्हणाल्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी देखील धारूरच्या विकासासाठी आपण कटीबध्द राहू असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला  नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी यांनी ना. पंकजाताई व खा. प्रितमताई यांचे जंगी स्वागत केले. ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment