तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

सादलापूर येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी गंगाखेडचे युवा कार्यकर्ते धावले
 शासन-प्रशासनाचे संतापजनक दुर्लक्ष


अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील सादलापूर येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या आत्महत्येस तेरा दिवस ऊलटून गेले तरी शासन-प्रशासनाकडून कसलीच दखल घेतली न गेल्यामुळे संताप व्यक्त केला जात असताना गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव आणि गोपीचंद पडळकर विचार मंचचे जिल्हाध्यक्ष सखाराम बोबडे यांनी या कुटुंबास मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नुकतीच त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली असून शासन, प्रशासन आणि सामाजीक संस्थांची शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
सादलापूर येथील ३५ वर्षीय शेतकरी बालाजी पांढरे यांनी गृह कर्जाचा डोंगर आणि सततची नापीकी यास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेत पांढरे यांनी आपली जीवन यात्रा संपवली. महिंद्रा फायनान्सचे थकलेले गृह कर्ज सततच्या नापीकीमुळे फेडणे अशक्य झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याची चिठ्ठी लीहून पांढरे यांनी गळफास घेतला. त्यांच्या अकाली मृत्यू मुळे वयोवृध्द आई, तरूण पत्नी आणि दोन अजाणत्या चिमुकल्यांचा आधार हरवला. कुटूंब ऊघड्यावर आले. चिखला-मातीच्या भिंती, पत्र्यांचे छप्पर असलेल्या छोटेखाणी घरात दिनांक १२ फेब्रुवारी रोजी तेरवीचे सोपस्कार पार पाडण्यात आले. झालेले दुःख आणि त्यातल्या त्यात घरच्या आर्थीक आणीबाणीमुळे केवळ खांदेकरी आणि अत्यंत जवळचे आप्तेष्ट यांनाच निमंत्रीत करण्यात आल्याची माहिती मयत बालाजी पांढरे यांचे चुलतभाऊ भगवानराव पांढरे यांनी दिली. 
      अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी आर्थीक मदत पांढरे कुटूंबास मिळणे आवश्यक होते. तसेच मानसीक आधारही तीतकाच महत्वाचा होता. पण मयत बालाजी पांढरे यांची तेरवी पार पडली तरी शासन-प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी पांढरे यांच्या घराकडे फिरकला देखील नाही. ही बाब सादलापूर, पालम येथील कांही जागरूक पत्रकारांनी निदर्शनास आणून देताच कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, गोपीचंद पडळकर विचार मंचचे सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष सखाराम बोबडे यांनी आपल्या सहकार्यांसह सादलापूर येथे धाव घेतली. पांढरे कुटुंबीयांची भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. संबंधीत पोलीस अधिकारी, तहसील कर्मचारी यांचेशी संपर्क साधत शासकीय आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहीती घेतली. तसेच संकल्प राष्ट्र उभारणीचा ग्रुपचे श्री शामसुंदर निरस सर यांचेशी संपर्क साधण्यात आला. आता पांढरे यांच्या कुटुंबियांना शासन आणि सेवाभावी संस्थांकडून मिळू शकणारी शक्य ती सर्व मदत लवकरात लवकर मिळवून दिली जाणार आहे. यात प्रामुख्याने आर्थीक मदतीबरोबरच उदरनिर्वाहासाठीचे साहित्य, पाल्यांच्या शिक्षणाची सोय आदि बाबी ऊपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती गोविंद यादव, सखाराम बोबडे यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत भाऊसाहेब कुकडे, दत्तराव भीसे,सादलापूरचे पोलीस पाटील देवीदास बोईनवाड, पालम येथील जेष्ठ पत्रकार शांतीलाल शर्मा, डी. एस.कळंबे, शिवाजी शिंदे, गोविंद सोलेवाड अादिंची ऊपस्थिती होती.

No comments:

Post a comment