तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

कान बहिरे अन्‌ नजर तल्लख ठेवल्यास समाजाची प्रगती- पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने

माध्यमांनी जोपासावी सामाजिक बांधिलकी-इंजि.शरद तांदळे

इंजि.नवनाथ घाडगे यांना नगरभूषण, अलखैर पतसंस्थेस सद्‌भावना,तर डॉ. आनंद देशपांडे यांना युवागौरव पुरस्कार प्रदान

दै.वार्ताचा 11 वा वर्धापन दिन साजरा

महादेव गित्ते 
===============  
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
समाजातील आजचे चित्र बदलण्यासाठी आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करा त्यांच्या शिवाय दुसरा ईश्वर नाही.अवांतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामात सचोटी आणि सातत्य ठेवा.तसेच कान बहिरे अन्‌ नजर तल्लख ठेवली तरच प्रगती साधता येते आणि हाच खरा यशाचा मंत्र आहे. असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.तर माध्यमांनी सामाजिक  बांधिलकी जपली पाहिजे आज माध्यम जगतामध्ये जे काही चित्र आहे.ते पाहिल्यानंतर सामान्य माणसाला भिती वाटू लागली आहे.ती भिती दूर करण्याचे काम माध्यमांनी करावे,अशी अपेक्षा इंजि.शरद तांदळे यांनी व्यक्त केली.अंबाजोगाई येथे दैनिक वार्ताचा 11 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा मुंबई येथे बृहन्मुंबई महानगर पालिकेत कार्यकारी अभियंता असलेले इंजि. नवनाथ घाडगे पाटील यांना नगरभूषण, अंबाजोगाई येथील अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेस सद्‌भावना पुरस्कार तर पुणे येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ तथा अंबाजोगाईचे भूमिपुत्र डॉ.आनंद देशपांडे यांना युवागौरव पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने,इंजि. शरद तांदळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील माजी नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील युथ आयकॉन शरद तांदळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.अंजलीताई घाडगे,सामाजिक कार्यकर्ते बबनराव आपेट,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर,पुणे येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगांवकर व दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते उपस्थित होते.यावेळी  मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  या प्रसंगी बोलतांना पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी सामाजिक  प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून आजच्या मोबाईलवेड्‌या तरूण पिढींवर प्रहार केला. आज सर्वात जास्त रुग्ण हे डोळ्यांच्या आजाराचे,मानेच्या आजारांचे आणि इतर आजारांचे दिसून येत आहेत. मोबाईलचा अतिवापर झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. समाज हा वेगळ्या दिशेने जात असून त्यासाठी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सामाजिक स्थान डळमळीत होईल की काय? अशी भिती वाटू लागली आहे. कारण घरातील संवाद हा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे घरांमधील अंतर हे वाढत असल्याचे दिसत आहे.प्रगती साधावयाची असेल तर आपले कान बंद ठेवावे लागतील.कारण, समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी पेरणारे असतात त्याकडे लक्ष जाणार नाही आणि नजर तल्लख ठेवली तर आपला उद्देश जोपर्यंत साध्य होत नाही. तोपर्यंत त्यापासून हटवायची नाही. कुटुंबामध्ये आई-वडिलांवर प्रेम करा.त्याच्याशिवाय काहीही नाही.आई-वडिलांची सेवा केल्यास खूप आनंद आणि आशीर्वाद मिळत असतात. वार्ता समुहाने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.कारण,चांगले काम करणाऱ्याचे कोणी कौतुक केले तर त्याचे मनोबल वाढत असते म्हणून अशा उपक्रमांची देखील समाजाला गरज असते. 
यावेळी बोलतांना इंजि. शरद तांदळे म्हणाले की,माध्यम जगतांमध्ये पाहिल्यानंतर समाजाचा समतोल बिघडू लागला असल्याचे दिसत आहे. कारण टीआरपीसाठी अनाठायी गोष्टी व अनाठायी विषय लादले जात आहेत.परवाच्या वेगवेगळ्या घटनांकडे आपण कसे पाहतो? किंवा कशा पद्धतीने पाहिले पाहिजे.हे माध्यमांनी सांगितले पाहिजे.परंतु माध्यमं एवढी आक्रमक आणि पुढं असतात की त्यावरून सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांपेक्षा त्यांचाच अतिरेक व अतिउत्साहीपणा दिसून येतो.त्यामुळे माध्यम क्षेत्राची विश्वासार्हता डळमळीत होऊ लागली आहे.माध्यमांकडं पाहून जगाची आणि देशाची वाटचाल सुरू असते.दर्पण म्हणजे आरसा ज्या माणसाच्या सुंदरतेची व कुरुपतेची छबी त्या दर्पणात दिसते अशा दर्पणानेच सामान्यांची साथ सोडली तर समाज संपूर्ण भरकटेल तेव्हा माध्यमांनी सामाजिक बांधिलकी जपून आपले कर्तव्य अदा करावे, अशी अपेक्षा इंजि.शरद तांदळे यांनी व्यक्त केली.  
तर अध्यक्षीय समारोप करतांना राजकिशोर मोदी म्हणाले की,अंबाजोगाई शहर व परिसरात वार्ता समुहाचा प्रभाव आहे. सामाजिक भान राखून या वृत्तपत्राने आपली भूमिका निभावलेली आहे.सामाजिक स्तरावर वार्ता समुहाचा वेगळा वाचक वर्ग आहे. अंबाजोगाई शहराच्या राजकीय आणि सामाजिक जडण-घडणीमध्ये वार्ता समुहाचे योगदान निश्चित आहे.या वृत्तपत्राने सर्व विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातून सामाजिक समतेचा संदेश दिला जातो.वार्ता समुहाने पुरस्कार देऊन काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला आहे व त्यांचा उत्साह वाढवला आहे.अंबाजोगाई शहराच्या भूमिपुत्रांनी राज्यात आणि राज्याच्या बाहेर व परदेशात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवलेला आहे. ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. वार्ता समुहाने आपले कर्तव्य पार पाडत असतांना वेगवेगळ्या घटकांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. 

नगरभूषण पुरस्काराने वाढली जबाबदारी-इंजि. नवनाथ घाडगे पाटील
===============
    ज्या गावामध्ये येण्यासाठी माझ्याकडे साधी सायकल नव्हती. दररोज बारा कि.मी. चा प्रवास पायी पार करून शिक्षणासाठी येत होतो. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.  परंतु शिक्षणाने जगण्याचा नवा मार्ग दाखवला आणि आईवडिलांनी शिक्षणासाठी बळ दिले. गेल्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असतांना अनेक चढउतार पाहिले आणि त्यातून मार्ग काढत गेलो परंतु आज वार्ता समुहाने मला नगरभूषण पुरस्कार देऊन माझा सन्मान केला हा निश्चितच जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. कारण एक अभियंता म्हणून असेल किंवा एक मराठा सेवा संघाचा पदाधिकारी म्हणून असेल राज्यभर  काम केले. पण माझ्या कामाची दखल माझ्या गावाने घ्यावी आणि त्याचा कौतुक सोहळा आयोजित करावा ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. वार्ता समुहाचा हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आता जबाबदारी वाढलेली आहे. परंतु तेवढीच ऊर्जा देखील मिळाली आहे. एवढं मात्र, खरे असे मत  नगरभूषण पुरस्कारप्राप्त इंजि. नवनाथ घाडगे पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.


वार्ता समुहाने दिली शाबासकीची थाप-शेख उमर फारूख
===============
अंबाजोगाई शहर आणि परिसरात अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने समाजातील छोट्या-छोट्या घटकांना पुढे आणण्यासाठी आर्थिक बळ देण्याचे काम केले. जो मार्ग अल्लाहने दाखवला त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न अलखैर पतसंस्थेने केलेला आहे. समाजातील आर्थिक दारिद्रय संपले पाहिजे आणि उपेक्षित व वंचित घटकांना प्रवाहामध्ये आणले पाहिजे.या भूमिकेतून अलखैर संस्थेने अनेकांना अर्थसाह्य उपलब्ध करून दिलेले आहे.या कामामध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींचे योगदान लाभले.त्यामुळे ही पतसंस्था नावारुपाला आली.आज साधारणतः 10 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे.ही फक्त प्रामाणिक व निःस्वार्थी सभासद, ग्राहक आणि कर्जदारांच्या नियमित फेडीमुळे होऊ शकले. हजारो गोर-गरीबांच्या व सर्वसामान्यांच्या घरामध्ये आशेचा नवा किरण अलखैरने दाखविण्याचे काम प्रामाणिक काम केलेले आहे.अशा कामाची दखल वार्ता समुहाने घेतली आहे.त्यामुळे आमच्या कामाची गती अधिक वाढण्यास मदत मिळणार आहे. 


ज्यांनी घडवले त्यांच्याकडूनच सन्मान हा भाग्याचा क्षण-डॉ.आनंद देशपांडे
-------------------------
अंबाजोगाई शहरात पहिली ते वैद्यकीय शिक्षण पार पडले.या शहराने मला शिकवण्याचे आणि घडवण्याचे काम केले. विशेष म्हणजे माझे वडील.प्रा.ए.बी. देशपांडे यांनी व माझ्या आईने चांगले संस्कार करून पुढे जाण्याचे बळ दिले.शिवाय गुरुजन वर्ग आणि या गावातील प्रत्येक माणसाने माझ्या कामाचे कौतुक केलेले आहे.त्या कामाची पावती आज खऱ्या अर्थाने मिळाली असल्याची माझी भावना आहे. पुण्यासारख्या शहरात काम करत असतांना अनेक माणसं येतात, भेटतात आपलं दुःखं सांगतात त्यांच्या निवारण्यासाठी माझा प्रयत्न असतो शिवाय अंबाजोगाई येथूनही अनेक नेत्ररुग्ण येतात आणि उपचार करून जातात ज्या शहरामध्ये मी शिकलो,घडलो त्याच शहरानं मला  युवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं हा माझ्यासाठी जीवनातील अमुल्य ठेवा आहे. या उंचीपर्यंत येण्यासाठी माझी पत्नी आणि माझं कुटुंब समर्थपणे माझ्या पाठीशी राहिलं शिवाय  या गावातील सर्वस्तरांतील नेतृत्वांनी माझे कौतुक करून पुढे जाण्याचे बळ दिले. त्याबद्दल मी वार्ता समुहाचा आणि तमाम अंबाजोगाईकरांचा ऋणी आहे.हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा देणारा असणार आहे. यामुळं माझ्या कामाची गती निश्चितच वाढेल एवढं मात्र नक्की.
प्रारंभी स्व.द्रौपदीबाई गित्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले प्रास्ताविक  संपादक परमेश्वर गित्ते यांनी तर आभार प्रदर्शन गजानन मुडेगांवकर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ता परिवार,अंबाजोगाई पत्रकार संघ,तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई,मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार  संघ,शाखा अंबाजोगाई आणि गुड मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाईने परिश्रम घेतले.या कार्यक्रमास   महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment