तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

सचखंड एक्सप्रेसचे सेलूत जल्लोषात स्वागत मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या संघर्षाला यश

प्रतिनिधी
सेलू:-गेल्या सहा वर्षापासून सचखंड एक्सप्रेसला सेलू रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, यासाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघांच्या सेलू शाखेने केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. गुरूवारी ( दि.७ मार्च)  सेलूवासियांनी अमृतसरकडे जाणार्‍या सचखंड एक्सप्रेसवर पुष्पवृष्टी करून, रेल्वे इंजिनला सजवून, पेढे वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशाच्या निनादात जल्लोषात स्वागत करून आनंद व्यक्त केला. 
यावेळी परभणीहून सेलू पर्यंत प्रवास करणारे खासदार संजय जाधव, रेल्वेचालक राकेश रंजनकुमार, मोहंमद सलीम, गार्ड के.सी.मीना, स्टेशन मास्तर अंशू कुमार व तिकीट तपासणीसांचा मराठवाडा रेल्वे प्रवासी संघातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.
संचखंड एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी सहकार्य करणारे खासदार संजय जाधव, रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांचे सचिव प्रवीणकुमार गेडाम, प्रतिभा गेडाम, वामनतात्या बोराडे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, पत्रकार व शहरातील विविध सामाजिक संघटनांचे यावेळी ॠण व्यक्त करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, राम खराबे, सुरेश ढगे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य मागण्याही मंजूर होतील : खासदार जाधव

सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळाला. याचे सर्व श्रेय सेलू येथील मराठवाडा रेल्वे प्रवासी संघांलाच आहे. श्री.मालाणी व त्यांच्या टीमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. नगरसोल-नरसापूरलाही थांबा मिळावा, तसेच मराठवाडा एक्सप्रेसला रांजणी थांबा, नांदेड-मुंबई नवीन रेल्वे, तसेच सेलू स्थानकावर मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात, अशीही मागणी आहे. त्याही लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही श्री.जाधव यांनी यावेळी दिली.
पाच तालुक्यातील नागरिकांना लाभ : शिवनारायण मालाणी

संचखंड एक्सप्रेसला सेलू थांबा मिळाल्याने सेलूसह पाथरी, मानवत, परतूर, मंठा तालुक्यातील नागरिकांना थेट दिल्लीपर्यंत जाण्याची सुविधा झाली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी यांनी यावेळी केले.

असे असेल वेळापत्रक

दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालय, नांदेड विभागातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार                                                           7 मार्च 2019 पासून गाडी संख्या 12715 / 12716 नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसला सेलू रेल्वे स्थानकावर सहा महिन्यांकरिता प्रयोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे.
गाडी संख्या 12715 हूजूर साहेब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस सेलू रेल्वे स्थानकावर सकाळी 11.09 वाजता थांबेल आणि 11.10 वाजता सुटेल, तर गाडी संख्या 12716 अमृतसर-हूजूर साहेब नांदेड सचखंड एक्स्प्रेस सेलू रेल्वे स्थानकावर दुपारी 13.08 वाजता थांबेल आणि 13.09 वाजता सुटेल.

No comments:

Post a Comment