तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

वस्तुस्थितीशी फारकत व आकड्यांची फेरफार असलेला 'व्यर्थ'संकल्प;जुन्याच घोषणांचा सुकाळ व अंमलबजावणीचा दुष्काळ असलेला अर्थसंकल्प --  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका

मुंबई, (प्रतिनिधी) दि. २७ :- आज सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प वस्तूस्थितीशी फारकत असलेला, आकड्यांची फेरफार करुन सादर केलेला 'व्यर्थ'संकल्प आहे. जुन्याच घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीच दुष्काळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. यातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनतेच्या हालअपेष्टा जराही कमी होणार नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आजच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना श्री. धनंजय मुंडे म्हणाले की, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असल्याचे वित्तमंत्र्यांनी धडधडीत खोटे सांगितले. शिवरायांच्या स्मारकाला सर्व परवानग्या प्राप्त आहेत तर पंतप्रधानांनी जलपूजन केल्यानंतरही दोन वर्षे हे काम का रखडले आणि सर्वोच्च न्यायालयाने या कामाला स्थगिती का दिली, असा प्रश्नही श्री. मुंडे यांनी विचारला.

वित्तमंत्र्यांनी सभागृहात सांगितल्याच्या नेमकी उलटी स्थिती आज राज्यात आहे. आज जनता भययुक्त, भीतीयुक्त, विषमतायुक्त आहे. युवक मात्र रोजगारमुक्त आहे. राज्यातल्या संपत्तीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा हक्क असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं, परंतु गेल्या साडेचार वर्षात त्याचा कधीही अनुभव आला नाही. शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरु राहील असं वित्तमंत्री म्हणाले. कर्जमाफीला दीड वर्ष होऊनही लाखो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा कायम आहे. कर्जमुक्ती वेळेत न झाल्यास तीचा हेतू व्यर्थ ठरतो म्हणूनच हा अर्थसंकल्प व्यर्थ आहे, असे श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या ४५ वर्षातील बेरोजगारीचा सर्वाधिक दर गेल्यावर्षी असल्याचं राष्ट्रीय नमुना पाहणीत उघड झालं. तरीही वित्तमंत्री देशात ७९ लाख आणि देशात २० लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याचा दावा करत असतील, तर ते धडधडीत खोटं बोलत आहेत.

राज्याच्या १५१ तालुके, २६८ महसूल मंडळे आणि साडेपाच हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी राज्यातील निम्म्याहून अधिक गावे भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यांच्यासाठी  केलेली तरतूद अपूरी आहे. जलसंपदा आणि ऊर्जा विभागाासाठीही अत्यल्प तरतूद असल्यानं याचा शेतकऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता नाही.  वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात मेक इन्‌ महाराष्ट्र,  मॅग्नेटिक महाराष्ट्र अशा अनेक योजनांची नावे घेतली, परंतु गेल्या तीन-चार वर्षातलं त्यांचं यश हे शून्य आहे, असंही श्री. धनंजय मुंडे यांनी लक्षात आणून दिलं.

No comments:

Post a Comment