तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन





वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ सुरु 

महादेव गित्ते 
-------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- 
    देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे अयोजन करण्यात आले असुन रविवार दि.03 ते 07 मार्च दरम्यान वैद्यनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. महाशिवरात्रीचे वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शनिवार पासुनच राज्य व परराज्यातुन भाविकांची रेलचेल सुरु झाली आहे. रविवारीही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. 
    4 मार्च रोजी महाशिवरात्र असल्याने वैद्यनाथ मंदिरात हजारों भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणुन धर्म दर्शन मध्ये पुरुष व महिलांच्या दोन स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत. व पास धारकांची स्वतंत्र रांग असेल. प्रवेशिका पत्रिका (पासची) सोय करण्यात आली आहे. दर्शन पासचे शुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे. चार मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8 च्या दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते वैद्यनाथास रुद्र अभिषेक करण्यात येणार आहे. या अभिषेका नंतर भाविकांना अभिषेकास परवानगी देण्यात येणार आहे. अभिषेकासाठी एका अवरतनास शंभर रुपये व सप्तनिक दीडशे रुपये असतील.    परळी परिसरातील शिवभक्तांसाठी विनामुल्य पास लाईन दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चार मार्च रोजी रात्री 10 पासुन ते रात्री 12 पर्यंत पासच्या रांगेतुन विनामुल्य दर्शन घेता येईल. त्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ओळखिचा पुरावा दाखवावा लागेल. 
    5 मार्च रोजी प.पु.सोमयाजी दीक्षित यज्ञेश्‍वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ मंदिर जवळील प्रांगणात श्री सुक्त हवन होणार आहे. तसेच परिसरातील सर्व शिव भक्तांना दर्शन मंडप येथे महाप्रसादाची व्यवस्था दुपारी 12 ते 4 दरम्यान करण्यात आलीः आहे. 
    6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता श्री वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल सायं.6 वा. देशमुखपारा जवळ सुप्रसिध्द गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांचा भक्तीगीत व अभगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. अंबवेस येथे रात्री 9 वाजता शोभेचे दारु उडविण्यात येईल. त्यानंतर गणेशपार, नांदरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंताची हजेरी होईल. नंतर अंबवेस, भोईगल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल. 7 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 वैद्यनाथ मंदिरात मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम होईल. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ.विपिन विलासराव पाटील व सचिव राजेश देशमुख आणि विश्‍वस्त मंडळाने केले आहे. 
    वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यावर लोखंडी बॅरिकेट्स उभारण्याचे काम पुर्ण झाले असुन ऊनापासुन बचाव व्हावा म्हणुन भव्य मंडप टाकण्यात आला आहे. मंदिरात रंगरंगोटी करुन विद्युत रोषणाई करुन करण्यात आली आहे. 
    चोख पोलिस बंदोबस्त 
    शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. वैद्यनाथ मंदिरात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, सहा पोलिस निरीक्षक, 26 पोलिस अधिकारी, 260 पोलिस कर्मचारी, 70 महिला पोलिस कर्मचारी, एस.आर.पी.ची एक प्लॅटुन, आर.सी.पी.चे एक प्लॅटुन, क्यु.आर.टी.चे दोन प्लॅटुन, 100 होमगार्ड असा बंदोबस्त असेल. बॉम्ब शोध व नाशक पथक, दरोडा प्रतिबंधात्मक पथक, एलसीबी पथक तैनात असेल अशी माहिती परळी शहरचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके व संभाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तेजन्युजशी बोलतांना दिली. 
    बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली यात्रा महोत्सवात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे मंदिराच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. 
    वाहनाधारकांनी महाशिवरात्रीच्या काळात वैद्यनाथ मंदिराकडे येतांना उड्डानपुल मार्गे शिवाजी चौक मार्गे नवगण कॉलेज रोड रस्तयाचा वापर करावा. नवगण कॉलेज रोडवरील प्रांगणात पोलिस अधिकारी निवासस्थान जवळ पार्किंगची सोय करण्यात आली आहे.  आर्य वैश्य मंगल कार्यालयाकडे येणार्‍या वाहनांसाठी तोतला मैदाना जवळ वाहनांची पार्किंगची सोय राहील. अशी माहिती शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली.  महाशिवरात्री निमित्त तोतला मैदान येथे राहाट पाळणे, खेळणी साहित्याचे दुकाने थाटण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment