तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी आमदार विनायक मेटे यांची बंदखोलीत चर्चाआम्ही सामाजिक प्रश्नावर एकत्र येवून लढणार - फुलचंद कराड

परळी वैजनाथ, ता.05 (प्रतिनिधी) : -

शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी आज मंगळवारी (ता.05) भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची भेट घेतली. या राजकीय भेटीने एकच खळबळ उडाली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमदार श्री मेटे श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते, परंतु त्यातच या दोन नेत्यात ‘चाय पे चर्चा’ बंद खोलीत रंगली होती. मी भाजपात आहे असे सांगत शिवसंग्राम किंवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी प्रतिक्रिया फुलचंद कराड यांनी दिली. आम्ही व आमच्या संघटना सामाजिक प्रश्नांवर यापुढे एकत्र येवून लढणार असल्याचे श्री कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दोन नेते आमदार विनायक मेटे व भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्यात रंगलेली ‘चाय पे चर्चा’ हा आज दिवसभर परळीत राजकीय गोटात चर्चेचा विषय होता. मागील कांही कालावधीपासून भाजपाने दुर्लक्षीत केलेले फुलचंद कराड पक्षत्याग करणार अशी चर्चा होती. त्यातच आमदार श्री मेटे महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री वैद्यनाथ प्रभुंच्या दर्शनासाठी आले होते. आज त्यांनी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेत वेगळीच भर पडली. सुमारे तासभर या दोन नेत्यात बंद दाराआड चर्चा झाली.

या भेटीचे कारण काय? याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी श्री कराड यांना छेडले असता मी भाजपमध्येच आहे, इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा श्री कराड यांनी केला. आमदार श्री मेटे दर्शनासाठी आले होते. त्यांनी माझी भेट घेतली यात चुकीचे काय असा सवाल फुलचंद कराड यांनी केला.

आमदार श्री मेटे यांची शिवसंग्राम व आपली भगवान सेना या दोन संघटना असून सामाजिक प्रश्नावर आम्ही एकत्र काम करणार असून केवळ त्यावरच आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा तिढा सुटला, परंतु विषय न्यायालयात आहे. वंजारा समाज 2% आरक्षणावर समाधानी नाही, समाज ‘बॅक टू ओबीसी’ साठी लढा उभारणार आहे. यासाठी भगवान सेना-शिवसंग्राम एकत्र येवून काम करणार असून त्यावर आमची चर्चा झाल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.

आम्ही भाजप-शिवसेना महायुतीचे घटक आहोत, मी भाजपातच आहे, भविष्यात राहील सुद्धा परंतु या भेटीचा कोणी वेगळा अर्थ काढू नये असे कराड यांनी सांगितले. आ.मेटे- फुलचंद कराड यांची आजची भेट उद्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरेल अशी सुद्धा चर्चा होत आहे. आज दिवसभर कराड-मेटे यांच्यातील भेट ‘बे्रकींग न्यूज’ म्हणून झळकत होती.

या भेटीबाबत आ.विनायक मेटे यांच्याशी संपर्क साधला असता सामाजिक विषयावर आम्ही एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. फुलचंद कराड हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून त्यांना यापूर्वीच आमदार करायला पाहिजे होते असे ते म्हणाले. कराड यांचा राजकीय प्रवास, केलेला संघर्ष गोपीनाथराव मुंडे हयात असते तर उच्च शिखरावर गेला असता. युतीत सुद्धा घटक पक्षाला न्याय मिळाला असता असे ते म्हणाले. दरम्यान, या भेटीच्या वेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, भाजपचे युवक नेते संदीपान आंधळे, सुग्रीव नागरगोजे, प्रशांत कराड, कल्पेश गर्जे, रवी कराड यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment