तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

परळी वैजनाथ ते अंबाजोगाई रस्त्यासाठी असहाय्य नागरिकांनी घातले प्रभू वैद्यनाथाला साकडे
मानवी कक्षेपलीकडील कामांसाठी नागरिकांनीच काढली विजयपथ संकल्प यात्रा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी वैजनाथ  - अंबाजोगाई दरम्यान सुमारे तीन वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रलंबीत हक्काच्या रस्त्यासाठी दि. ३ मार्च रोजी कन्हेरवाडी ते प्रभू वैद्यनाथ मंदिर अशी विजयपथ संकल्प यात्रा आयोजित केली गेली.  ठीक ४ वाजता कन्हेरवाडी येथील नदीपासून निघालेल्या यात्रेचे आयोजन ना कोणता राजकीय पक्षाने किंवा ना कोणत्या संघटनेने केले. विजयपथ संकल्प यात्रा आयोजन फक्त एक सामान्य परळीकर म्हणून नागरिकांनी नागरिकांसाठी केले होते.

कन्हेरवाडीपासून निघालेली यात्रा प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली. यावेळी जगंनियंता प्रभू वैद्यनाथास "परळी वैजनाथ ते अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण करण्याची सद्बुद्धी शासन तसेच प्रशासनास देण्यासाठी साकडे घालण्यात आले.

प्रभू वैद्यनाथाच्या चरणी ठेवलेल्या अर्जात हे "प्रभू, तू सर्वज्ञ त्रिकालदर्शी आहेस. असे म्हणतात जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरत होता तेव्हा तो देखील विज्ञाननिष्ठ असून म्हणाला होता 'हे देवा, माझे आयुष्य तुझ्या हाती आहे. सांभाळून घे मला.' अगदी याचप्रमाणे प्रभू वैद्यनाथा तुझ्या नगरीतून माता योगेश्वरीकडे अर्थात अंबाजोगाईला जाणारा रस्ता मायबाप सरकारी यंत्रणांनी सुमारे गेल्या तीन वर्षांपासून दुतर्फा खोदून ठेवला आहे. त्यामुळे हे काम आता मानवी शक्ती पल्याड असलेल्या तुझ्याचं हाती आहे, त्यामुळे हे धन्वंतरीच्या जन्मदात्या तुझ्या गावांतील नागरिकांचे आरोग्यच नाही तर आयुष्य धोक्यात आले आहे. तेव्हा हे भोलेनाथा आमचे काही चुकले असेल तर तुझ्या लेकरांना क्षमा कर व पदरात घे. मायबाप सरकारी लालफितीत अडकलेल्या मंडळींना त्वरित हे काम सुरू करण्याची व यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्याची सद्बुद्धी दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना." अशी कळकळीची आर्जव नागरिकांनी महाशिवरात्री पर्वाच्या पावन पार्श्वभूमीवर प्रभू वैद्यनाथकडे केली. इतके वर्षे लालफितीत अडकलेला रस्ता केव्हा मार्गी लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या अर्जाचा प्रतिलिपी प्रधानमंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री - बीड जिल्हा, विरोधी पक्षनेते - विधान परिषद, खासदार - बीड जिल्हा आदींना पाठवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment