तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 March 2019

जागो ग्राहक जागो म्हणत अभिनव विद्यालयाने साजरा केला जागतिक ग्राहक दिन






परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी) :- 
      ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ग्राहक दिन प्रत्यक्षात विद्यार्थी ग्राहक म्हणून बाजारपेठेत जावुन साजरा केला. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. 
ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मोफत मिळेल, चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षिसे जिंका, भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल, अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो, वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता ही तिच वस्तू असल्याचं नीट पारखून घेवून स्वतःची फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहावे लागते. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचं प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. ऑनलाईन वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. आता रेरा कायदाही अमलात आला आहे. आणि जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचं आहे. असे मत साहेबराव फड यांनी व्यक्त केले. 
    यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात बाजारपेठेत जाऊन वस्तू खरेदी कशी करतात व ग्राहकांची फसवणूक कशी होते याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी बाजारात सुवर्ण शाॅप, मेडिकल, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान,भाजी पाला स्टाॅल, ए टी एम मशीन, लघु उद्योगांना सह विविध दुकानावर जावून वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी व फसव्या जाहिरातींना बळी पडू नये तसेच वस्तू खरेदी करताना एम.आर.पी पेक्षा जास्त रक्कम देऊ नये, वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे, सोने खरेदी करताना हाॅलमार्ककडे लक्ष द्यावे, डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करुणच घेणे, वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासणे, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासणे आणि त्यानंतरच पेट्रोल भरणे, ऑनलाइन खरेदी करताना सजग राहावे, वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घेणे, ए टी एम मधून पैसे काढताना आपला गुपित क्रमांक कोणालाही देवू नये, आदी बाबत सखोल माहिती घेऊन जागो ग्राहक जागो मनत जागतिक ग्राहक दिन अभिनव पद्धतीने साजरा केला. यावेळी शाळेतील सहशिक्षक शत्रुघ्न भांगे, विठ्ठल फड, सविता जंगले , ज्योती शिंदे, ज्योती देशमुख, सूर्यकांत अनकाडे, विजय फड, राजेभाउ नागरगोजे, राजेभाउ दराडे, निलेश व्हावळे, कृष्णा गवळी यांनी बाजारपेठेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने सर्व व्यापारी यांचे सहकार्य बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment