तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

अबला नही हम सबला है…! मराठवाडा साथी, महिला मंचने काढलेल्या महिला बाईक रॅलीला मोठा प्रतिसादपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-
कर्तव्यनिष्ठ स्त्रिशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या महिला बाईक रॅलीने आज परळीत अक्षरश: ईतिहास घडविला. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा अनेक ऐतिहासीक थोर महिलांच्या वेशभूषा घेवून अनेक महिला आज संपूर्ण परळी शहरात बाईकवर स्वार होत रॅलीत सहभागी झाल्या. शहराच्या पाच कि.मी.पेक्षा अधिक अंतरात निघालेल्या या रॅलीचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. अबला नही हम सबला है.... मारत माता की जय… वंदे मातरम्‌ अशा घोषणांचा एकच निनाद अन दुसरीकडे मोटारसयकलच्या आवाजाचा दणदणाट असेच या रॅलीचे वैशिष्ट्य होते.
दैनिक मराठवाडा साथी महिला मंचच्या वतीने आज शुक्रवार दि.८ मार्च रोजी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून परळी शहरातून महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. शहर पोलिस ठाण्यापासून पुढे मौलाना अबुल कलाम आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, एकमिनार चौक, स्टेशन रोड, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार अंबेवेस, नेहरू चौक (तळ), लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर असा या महिला बाईक रॅलीचा मार्ग होता. एकसारख्या साड्या, डोक्यावर रंगीबेरंगी पेटे, कोणाच्या हातात तलवारी तर कोणी जिजाऊ, झाशीची राणी अशी वेगवेगळे पेहराव या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. नारी शक्तीला सलाम करण्यासाठी मराठवाडा साथीने आयोजित केलेल्या या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
पुरूषांच्या बरोबरीने बाईक चालवणाऱ्या अत्यंत निर्धाराने व तेवढ्याच आत्मविश्वासाने सहभागी झाल्या होत्या. एकामागूण एक मोटारसायकलवर महिला पुढे जात असतांनाच शिवाजी चौकात शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्याला दै.मराठवाडा साथी महिला मंचच्या वतीने नगराध्यक्षा सौ.सरोजीनीताई हालगे यांनी पुष्पहार अर्पण केला. विविध चौकांत फटाक्यांची आतिषबाजी करीत या रॅलीचे स्वागत होत होते. चौक तसेच रस्त्याच्या कडेला नागरीक सुध्दा अत्यंत कौतुकाने रॅलीला पाहतांना दिसून येत होते.


महिलांचे मुक्तांगण
रॅलीचा समारोप लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर परिसरात अत्यंत उत्साहात करण्यात आला. रॅलीच्या आग्रभागी असलेला ढोल-ताशा महिलांनीच ताब्यात घेत केवळ वाजविलाच नाही तर या ढोल-ताशावर महिलांनी मनापासून नृत्य केले. संयोजक थांबा म्हणत असतांनाही महिलांचे नृत्य काहीकेल्या थांबतच नव्हते. आज आमचा दिवस आहे, तो आम्हाला साजरा करू द्या अशी मुक्त सुचनाच देत महिलांनी आपल्या मुक्तांगणात सहभागी होत महिला दिन साजरा केला.

एक सेल्फी माझाही
डोक्यावर बांधलेला आकर्षक फेटा हा महिला व मुलींसाठी कौतुकाचा विषय होता. एरव्ही विविध कार्यक्रमात पुरूष फेटे बांधून पुढच्या रांगेत बसतात, परंतू आजचा दिवस महिलांचा असल्याने फेटेधारी महिला स्वत:चा सेल्फी काढण्यासाठी मोबार्ईल काढून क्लिक करीत होत्या. एक माझाही सेल्फी तु घे… मी तुझा घेते असा आग्रह महिला व मुलींनी यावेळी धरला. सेल्फीसाठी महिलांचा हा आग्रह महिला दिनाचा तर आहेच, परंतू आपल्याला फेटा कसा दिसेल हा त्यांच्यासाठी उत्सुकतेचा विषय होता.

पोलिसांचे आभार
पोलिस ठाण्यात महिला सहसा जातच नसतात, परंतू महिला दिनाच्या आजच्या रॅलीची सुरूवात पोलिस ठाण्याच्या परिसरातच फेटे बांधून करण्यात आली. आरोपी, पोलिस, फिर्यादी… यांची नेहमीच गर्दी असलेल्या ठाण्यात आज महिला राज होते. पोलिस कर्मचारी सुध्दा कौतुकाने महिलांच्या रॅलीचे कौतुक करतांना दिसून येत होते. रॅलीची सुरूवात पोलिस ठाण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संपूर्ण रॅलीतसुध्दा शेवटपर्यंत पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

तुम्ही शक्ती आहात, लढत रहा
जागतीक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा साथी महिला मंचच्या वतीने आज काढण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ संभाजीनगर व शहर पोलिस ठाण्यात करण्यात आला. यावेळी बोलतांना नगराध्यक्षा सौ.सरोजीनीताई हालगे म्हणाल्या की, स्त्री केवळ शक्ती नाही तर समाज घडविणारी समाजसुधारक आहे. तुम्ही शक्ती आहात, लढत रहा असे आवाहन त्यांनी केले. तर राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्या डॉ.सौ.शालिनीताई कराड यांनी लेक वाचवा, राष्ट्र वाचवा असे आवाहन केले. पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरिक्षक पठाण व महिला पोलिस अधिकारी सौ.अनुसया माने यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अड.सौ.पाळवदे, सौ.अन्नपूर्णाताई जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. हा पोलिस ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमाचचे सुत्रसंचलन महिला समुदेशन केंद्राच्या सौ.सुनिता नरंगलकर यांनी केले.

No comments:

Post a Comment