तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 March 2019

तर मग खा.प्रितमताईंना बिनविरोधच का नाही?


                लोकसभा निवडणुका जाहिर झाल्या, आचारसंहिता लागली. १८ एप्रिलला बीडचं मतदान आहे. हे सुद्धा निवडणुक आयोगाने जाहिर केलं. आता केवळ ३४ दिवस बाकी आहेत. एवढं असताना शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला उमेदवाराचा शोध लागत नाही. हे राजकीय दुर्दैव असुन दुसर्‍या बाजुने विद्यमान खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांना बिनविरोधच निवडुन विरोधक का देत नाहीत?हा सवाल आता मतदार जनतेच्या मनातुन ऐकायला मिळत आहे. स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या अपघाती निधनानंतर प्रितमताई अचानक राजकारणात आल्या. जिल्हावासियांनी प्रचंड मताने निवडुन दिले. मात्र पाच वर्षात त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं.  जे तमाम जनता मान्य करत आहे. लोकांनाच आता निवडणुक नको आहे. अशी त्यांची कामगिरी जनसामान्य जनतेने पाहिली. जर शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुक लढवायला त्यांच्या समोर कुणी येत नसेल?तर मग बिनविरोध देवुन विरोधक मनाचा मोठेपणा दाखवतील का?हाही प्रश्‍न आहे.

                प्रितमताई मुंडेंचं राजकारणात येणं हे जिल्ह्यातील तमाम मतदारबंधुंनी पाहिलेलं आहे. साहेबांचं निधन आणि त्यांनी खांद्यावर घेतलेलं वजन आणि त्यातुन पाच वर्षात केलेली कामगिरी. पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना बीड लोकसभा मतदारसंघातुन विरोधकांना अद्यापही उमेदवार न सापडणं यातच प्रितमताईच्या विजयाचं रहस्य आहे. राष्ट्रवादी पक्षाकडे ही जागा आहे. काँग्रेस पक्षाला त्यांनी देवु केली. पण काँग्रेसनं जागा लढवायला नकार दिला. सहा महिन्यापासुन बीडच्या जागेचा शोध राष्ट्रवादी पक्षाचे मोठे साहेब घेत आहेत. शेवटी अखेर उमेदवारच सापडला नाही. अनेकांना विचारणा झाली. स्पष्ट नकार काही पुढार्‍यांनी दिला. खरं तर पक्ष आदेश आल्यानंतर जो कार्यकर्ता आदेश पाळतो तोच कार्यकर्ता असतो. शरदचंद्र पवारांनी हा मतदारसंघ अजुन स्वत:च्याच ताब्यात ठेवलेला आहे. किमान एक डझन प्रमुख कार्यकर्त्यांना विचारणा केलेली आहे आणि अशा प्रकारे बीडबाबत त्यांची नेहमीच पंचायत झालेली आहे. यापुर्वीही बळंच उमेदवार त्यांना उभा करावा लागत असे. स्व.गोपीनाथराव मुंडे जिल्ह्यातुन संपवण्यासाठी अनेक डावपेच पवारांनी रचले. मग सुरेश धस, रमेश आडसकर यांच्यासारख्याला उमेदवार्‍या दिल्या. तरी खेळ जमला नाही. आता प्रितमताईच्या विरोधात नेमकं कोण?अजुन उत्सुकता शिगेला आहे. अमरसिंह पंडितांच नाव अंतिम टप्यात आहे तर बजरंग सोनवणे हे पण उमेदवार म्हणुन नमस्कार-चमत्कार घालीत फिरत आहेत. एखाद्या पक्षाचं राजकीय दुर्दैव आणि त्याची शोकांतिका कशी असते?ते या बीडात राष्ट्रवादीच्या श्रेष्ठीला अनुभवाला येतं. निवडणुक लढवायला उमेदवारच न मिळणे हा खरा राष्ट्रवादी पक्षाकडे एकमेव मतदारसंघ असावा. प्रकाशदादा सोळुंके, जयदत्त क्षीरसागर, धनंजय मुंडे यांच्यासाख्या धुरंधरांनी स्पष्ट नकार दिला. खरं तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी ही निवडणुक ओबीसीविरूद्ध ओबीसी लावण्याचा प्रयत्न केला. काहीजणांनी विरोधी पक्षनेत्यांनाच उमेदवारी देण्याचा बारामतीच्या मळ्यात जावुन खुप आग्रह केला. पण या क्षणापर्यंत अद्याप यश आलेले नाही. आता कदाचित अमरसिंह पंडित यांनाच बोहल्यावर बसण्याची वेळ येवु शकते. या मतदारसंघात विद्यमान खासदारांची जमेची बाजु आणि त्याची विजयाची खात्री एवढी पक्की आहे की ही निवडणुक आणि निवडणुकीचं वातावरण पुर्णपणे प्रितमताईच्या बाजुने फिरलेले आहे.विरोधकसुद्धा निवडुन कोण येणार? हा निकाल अगोदरच प्रितमताईच्या नावावर शिक्का मारून सांगत आहेत. पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडेंनी जिल्ह्यात केलेली कामगिरी ही सामान्य जनतेच्या नजरेत बसली आहे. जिल्ह्याला नेतृत्व कसं असावं?हे नाव डोळ्यासमोर येताच पंकजाताईंनं रचलेला राजकिय इतिहास न भुतो न भविष्यति आहे. विद्यमान खासदारांनी आम्ही राजकारणात दुर्दैवाने जरी आलो  तरी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी काय करू शकतं हे दाखवुन दिलं आहे. बीड-परळी-नगर हा रेल्वेचा प्रश्‍न याचि देहि याचि डोळा याच भगिनींच्या माध्यमातुन सुटला. खरं तर या प्रश्‍नावर बीड जिल्ह्यातील अनेक मातब्बर घराण्यांना लोकांनी संधी दिली. मात्र कुणीच हा प्रश्‍न सोडवला नाही. खा.प्रितमताई एकदा स्व.बाबुरावजी आडसकरांना भेटण्यासाठी आडसला गेल्या होत्या. त्यावेळी आडसकरसारख्या अनुभवी मातब्बर पुढार्‍यांनी मुली तुच रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लावु शकतेस अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडुन व्यक्त केली होती आणि चार वर्षात अगदी विक्रमादित्यासारखी कामगिरी मंत्री पंकजाताई आणि प्रितमताईंनी करून दाखविली. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातुन निर्माण केलेले जाळे म्हणुन हा जिल्हा आता प्रगतीच्या दृष्टीने पश्‍चिम महाराष्ट्राच्या यादीत या भगिनीने नेवुन ठेवला.केवळ गप्पा नाही, आश्वासने नाहीत, किंवा नाटकेसोगं नाहीत. आदी केले मग सांगितले जे स्वप्न पन्नास वर्षापासुन जिल्हा पाहत होता त्या बीड जिल्ह्याच्या मातीत रेल्वेचे रूळ पडले आणि अहमदनगरच्या सीमेतुन निघालेली रेल्वे बीडच्या मातीत काही किमी.का होईना येवुन धडकली. सर्वसामान्य लोकांना शेवटी काम पाहिजे असते आणि ज्यांनी करून दाखविले त्याच नेतृत्वाच्या पाठीमागे जनता राहत असते. खासदारांनी पाच वर्षात केलेली कामगिरी जिल्हावासियांच्या नजरेआड होत नाही. या मतदारसंघातील विजयाचा अंदाज आता दोन्हीही काँग्रेसच्या लोकांना आलेला आहे. अनेक सर्वे झाले, अंदाज झाले तरी पुन्हा प्रितमताईच विजयी होणार हे जेव्हा समोर आले तेव्हा गर्भगळित मानसिकतेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारच मिळेना ही जनमताची ताकद प्रितमताईच्या विजयासाठी कारणीभुत आहे हे मात्र नक्की. राजकारण त्यालाच म्हणतात ज्यात नैतिकतेच्या आधारावर राजकारण होत नाही. विरोधाला विरोध असतो त्यालाच राजकारण म्हणतात. खरी नैतिकता काय?तर विरोधकांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि या मतदारसंघाला निवडणुक लढवण्यापासुन बाजुला ठेवलं तर खर्‍या अर्थाने संपुर्ण देशात एक माणुसकीचा आदर्श बीड जिल्ह्याचा जावु शकतो. हा जिल्हा जलसंवर्धन असो किंवा इतर सामाजिक कार्यात जसा पुढे आहे तसाच देशाच्या नकाशावर आदर्श राजकारणी जिल्हा म्हणुन निश्‍चित पुढे येईल जेव्हा विरोधक मनाचा मोठेपणा दाखवुन विद्यमान खा.प्रितमताईंना बिनविरोध निवडुन देतील आणि परिस्थितीही तशीच आहे. आज जिल्ह्यात दहा लाखाच्या आसपास मतदार आहेत. शिवाय महिला आणि पुरूषात थोडा फार फरक सोडला तर महिलांची संख्या चार लाखापेक्षा अधिक आहे. महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील महिलांचा स्वाभिमान आणि स्त्री शक्तीचा सन्मान राष्ट्रवादी पक्षाने जर केला तर खर्‍या अर्थाने ही निवडणुक बिनविरोध होवु शकते. राष्ट्रवादीची श्रेष्ठी सद्या कौटुंबिक कलहात आडकली असुन ज्या बीड जिल्ह्यात अनेक घराण्यात राजकीय कौटुंबिक वाद पुढे आले त्याला जबाबदार बारामतीच्या पाहुण्यांनाच धरलेले आहे.त्यामुळे आज बारामतीच्या पवित्र राजकिय भुमिकेत कौटुंबिक युद्धाचे ढग जेव्हा बाहेर पडु लागले तेव्हा याच बीड जिल्ह्यातील मातीतला प्रत्येक माणुस जे पेरले तेच उगवणार अशी प्रतिक्रिया देवु लागला. बाकी काही असले तरी खासदारांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. पाच वर्षात सुवर्णकाळ तर आगामी पाच वर्षात विकासाचा पर्वकाळ निश्‍चित जिल्ह्यात सुरू होईल.शेवटच्या क्षणापर्यंत का होईना विरोधकांना सद्बुद्धी परमेश्वरांनी घालावी.

No comments:

Post a Comment