तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

ना. पंकजाताई मुंडे यांनी विभागीय बैठकीत केला मोठ्या विजयाचा संकल्प

भाजप-सेना युतीला विजयी करण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा

महादेव गित्ते
.....................................

औरंगाबाद ( प्रतिनिधी) :- दि. १७ -----   भाजप आणि  शिवसेनेची युती एका चांगल्या कामासाठी झाली आहे, युती होऊ नये म्हणून विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही. ही युती आता मजबूत झाली असून कार्यकर्त्यांनी झाले गेले विसरून जावून मराठवाड्यातील सर्व जागा ताब्यात घेण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा भाजपच्या मराठवाडा समन्वयक ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केला. 

   लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे आज भाजपा-शिवसेना युतीच्या मराठवाड्यातील पदाधिका-यांची विभागीय बैठक मोठ्या उत्साहात पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जून खोतकर, खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे, खा. सुनील गायकवाड आदींसह मराठवाड्यातील  सर्व आमदार, युतीचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

   यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, भाजप-सेनेची युती मी लहान असताना पासून पाहत आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंडे साहेबांचा कौटूंबिक स्नेह होता. युती शिवाय निवडणूकाच नव्हत्या पण आज पुन्हा एकदा युती झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनगटातलं बळ अजून वाढलं आहे. युतीचा काडीमोड व्हावा यासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही. 

  विरोधक कितीही एकत्र आले तरी युती सक्षम व्हावी यासाठी आपण सर्वानी  प्रयत्न केले पाहिजेत. देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आणणे गरजेचे आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने केलेली जनतेच्या हिताची कामे व योजना जनतेला ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. निवडणूकीचे युध्द सकारात्मक मानसिकता घेवून आपल्याला लढायचे आहे. 'छोटे मन से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता' या अटलजींच्या कवितेप्रमाणे छोट्या आणि कोत्या मनाच्या काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत नेस्तनाबूत करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा संकल्प आपण यानिमित्ताने करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

मुंडे साहेबांची आठवण
----------------------------
यावेळी बोलतांना ना पंकजाताई मुंडे यांनी आपणांस या क्षणाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण येत असल्याचे सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराच्या अशाच बैठका सुरू झाल्या त्यावेळी साहेब होते त्यामुळे  मी खूप श्रीमंत होते पण आता साहेब नाहीत, ही उणीव माझ्यासह सर्व सामान्य कार्यकर्त्यांना जाणवत आहे ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी  व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी रक्ताचे पाणी करू पण युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

1 comment:

  1. खूप छान लिहला आहे. सर आपण मला खूप आवडला आहे

    ReplyDelete