तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

प्रिय पर्रिकर,


 ---------------
शेवटचंच हे छप्पर होतं,
उन्हापासून जपणारं !
शेवटच्याही श्वासापाशी,
राष्ट्रासाठीच खपणारं !

देशापेक्षा जगामधलीच,
संपली ईमान निष्ठा !
धन्य वाटेल सरणामधल्या,
चंदनाच्या काष्ठा !

राज्य छोटं,मोठा नेता,
देश व्यापून उरलेला !
बातमी सोबत लाखो पापण्यात,
आषाढ होऊन भरलेला !

पर्रिकर हे दुर्मिळ नाव,
आता अधिक दुर्मिळ आहे !
राजकारणाच्या गालावर तो,
सौंदर्याचा तीळ आहे !

कृष्ण गेला, राजकारणाच्या..
द्रौपदिला आधार नाही !
आता कळेल राजकारणाहून,
कँन्सर मोठा आजार नाही !

हद्द संभाळणारा संत,
जपू लागला सरहद्द !
रक्त होतं पारदर्शी,
विचार म्हणजे साक्षात् जिद्द !

आत्मविश्वास अहंकारात,
जरा सुद्धा भिजला नाही !
"चूक झाली!" सांगताना,
अचूक योद्धा लाजला नाही !

मन हरण करतो त्यालाच,
भाषा म्हणते मनोहर !
यमक सुद्धा उधार नको,
म्हणून नाव पर्रिकर !

स्वर्गामधे कालपासून,
स्वागताची गडबड सुरू !
मातीकडून स्वर्गाकडे,
निघालाय ना कल्पतरू !

इंद्र आणि विष्णुलाही,
हवा होता सेनापती !
चित्रगुप्त सल्ला देई,
गोव्यात आहे गुणपती !

साधेपणा शब्दाला तर,
पर्रिकरच समानार्थी !
त्यागी निघून गेल्यावरती,
शिल्लक मागे फक्त स्वार्थी !

माहित होता दगा तरी,
सहन झाला नाही धक्का !
तुम्ही असता अनाथ होता,
प्रत्येक कामामधला टक्का !

ज्ञानेशांचा पुनर्जन्म,
हीच गोष्ट आता आधार !
आत्ता पाणी वाफ झालंय,
त्याचीच व्हावी संततधार !

कालपासून गळ्यात बांध,
डोळ्यामधे झरा आहे !
पारा निघून गेलाय आणि,
आरशावरती चरा आहे !

--------------------------
प्रमोद जोशी, देवगड
---------------------------
संकलन..
सुभाष मुळे, गेवराई

No comments:

Post a Comment