तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत परळी तालुक्यात 250 कोटींची कामे - ना. पंकजाताई मुंडे
आम्ही कागदावर नाही तर पारदर्शक विकास करतो, जात नाही तर विकास पाहून मतदान करा 

नागापुर, गाढे पिंपळगाव, सिरसाळा येथील सभा झाल्या हाऊसफुल्ल, महिलांची मोठी उपस्थिती 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 13......
      आम्ही भगिनींनी सर्वत्र पारदर्शक विकास केला आहे, इतरांप्रमाणे कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून जनतेच्या पैशावर डल्ला मारणे आम्हाला जमत नाही आणि बोगस कामे खपवून घेणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत परळी तालुक्यात 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत असे सांगून जातपात बघून नव्हे तर झालेला विकास बघून मतदान करा असे आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. आज नागापुर, गाढे पिंपळगाव, सिरसाळा येथील सभा हाऊसफुल्ल झाल्या, सर्व सभांना महिलांची मोठी उपस्थिती होती.
         बीड लोकसभेच्या भाजपा- शिवसेना- रिपाई - रासप-रयत क्रांती सेनेच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई यांच्या प्रचारार्थ ना. पंकजाताई मुंडे यांनी झंझावाती सभा घेतल्या. यावेळी व्यासपीठावर गोविंंदराव केेंद्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, जेष्ठ नेते नामदेवराव आघाव, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, दिनकर मुंडे, रमेश कराड, प्रभाकर वाघमोडे,  शरद राडकर, सतीश मुंडे, बालासाहेब दौडतले, माणिकराव सातभाई, आश्रुबा काळे, बळीराम गडदे, भीमराव मुंडे, नवनाथ देशमुख, कुंडलिकराव सोळंके, व्यंकटेश शिंदे, वृक्षराज निर्मळ, मुन्ना काळे, पप्पू चव्हाण, अर्जुनराव सोळंके, गणपतराव बनसोडे,  संतोष सोळंके, शिवराज मुंडे, श्रीमंत  सोळंके, सुनिल सोळंके आदींसह बहुसंख्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
     यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यावधी रुपये आणले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत परळी तालुक्यात 250 कोटी तर जिल्ह्यात 1800 कोटी खर्च करून ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणले आहे. जलयुक्त शिवार अंतर्गतही मोठ्या प्रमाणावर कामे झाली अराहेत असे सांगुन आगामी काळात जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कृष्णा खोरेचे पाणी बीड जिल्ह्यात आणणार असल्याचे त्यांनी  सांगितले.  जलसिंचनाची कामे करून जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले. 
कारखाना न काढणारेच टीका करण्यात आघाडीवर 
वैद्यनाथ साखर कारखाना अतिशय चांगल्या पध्दतीने चालू आहे. शेतकर्‍यांचे पैसे थोडे उशिरा दिले असले तरी पुर्ण दिले आहेत. मात्र ज्यांनी कारखान्याच्या नावाखाली जमिनी लाटून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे आणि कारखानाही उभा करू शकले नाहीत असेच कर्म दरिद्री लोक वैद्यनाथ कारखान्यावर टीका करून विनाकारण बदनामी करीत आहेत.  कारखान्याच्या बाबतीत खोट्या नाट्या बातम्या देऊन कारखान्याला बदनाम करणार्‍यांना तुम्हीच धडा शिकवा असे सांगून शेतकर्‍यांचा एक पैसाही बुडवणार नाही. मी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची कन्या आहे. त्यांनी जेवढे देता येईल तेवढे समाजाला, शेतकर्‍यांना, शेतमजूरांना दिले आहे. तिच परंपरा  आम्ही पुढे चालवत आहोत.  शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणार्‍या वैद्यनाथची अनावश्यक होणारी बदनामी थांबवा असा इशारा ही त्यांनी विरोधकांना दिला.
विकासावर बोलण्यासारखे कांही नसल्याने विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करायला सुरूवात केली आहे. साहेबांनी आणि आम्ही भगिनींनी कधीही जातीपातीचे राजकारण केले  नाही आणि करणार नाही. विकास हीच माझी जात असुन या मातीशी माझे नाते आहे. तुम्हीही जात पात न पाहता विकास पाहून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. महिलांना सन्मान मिळावा, निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. उज्वला गॅस योजना, घरकुल, शौचालय आदींना निधी देवून नागरिकांचा सन्मान करण्याचे काम आम्ही केले आहे तर बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग  जिल्ह्यात आणुन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.  आगामी काळात जिल्हा सुजलाम सुफलाम करून शेतकरी, महिला, युवक अशा सर्व घटकांसाठी विकासाची कामे करण्यासाठी पुन्हा एकदा खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांना आपली लेक म्हणून प्रचंड मते देऊन संसदेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. 
नागापूर, गाढे पिंपळगांव, सिरसाळा या तिनही सभा हाऊसफुल झाल्या.  विशेष म्हणजे या सभांना महिलांची मोठी गर्दी दिसुन आली.

No comments:

Post a Comment