तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

वैद्यनाथ कारखान्याने शेतकर्‍यांच्या ऊसाला 6 महिन्यानंतर दिला केवळ 1400 रूपये भावसंतप्त शेतकर्‍यांचा प्रशासनाला घेराव

आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनाच पोलीसांच्या नोटीसा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.03........ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ 1400 रूपये भाव दिल्यामूळे शेतकर्‍यांमधे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तब्बल 6 महिन्यानंतर व तो ही केवळ 1400 रूपये भाव मिळाल्यामुळे दुष्काळात होरपळून निघणार्‍या शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याच प्रकरणी संतप्त शेतकर्‍यांनी आज प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला. मात्र याच शेतकर्‍यांना पोलीसांकडून नोटीसा बजावण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये तिव्र रोष निर्माण झाला आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी कारखाना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकाही रूपयाचे बिल न दिल्याने शेतकरी
दुष्काळात संकटात सापडला होता. मागील दोन दिवसात काही शेतकर्‍यांच्या खात्यावर 1400 रूपये प्रति टन या प्रमाणे पैसे जमा होऊ लागले होते, मात्र 15 दिवसात पैसे देण्याचा नियम असताना 6 महिन्यानी पैसे देणार्‍या कारखान्याने केवळ 1400 रूपयांचा भाव दिल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली. यातील काही शेतकर्‍यांनी कारखान्यावर आंदोलन केले, तसेच व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना घेराव घातला व जाब विचारला. ऐन दुष्काळात कारखान्याने आमची लुट केली, अशा प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

दरम्यान शेतकरी संतप्त झालेला असताना दुसरीकडे आंदोलन का केले म्हणुन काही शेतकर्‍यांना पोलीसांकडून नोटीसा बजावण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांच्या रोषात भर पडली आहे. जिल्ह्यातील इतर कारखाने 2000 रूपये प्रमाणे 15 दिवसात पेमेंट देत असताना वैद्यनाथने केवळ 1400 रूपये भाव देऊन ऐन दुष्काळात शेतकर्‍यांच्या दुःखावर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

No comments:

Post a Comment