तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

हमार छोरीरो, अपमान कोणी हेयंदेवाळ


ना. पंकजाताई मुंडे यांच्याविषयी मेटे, पोटभरेंनी केलेल्या टीकेनंतर बंजारा समाज मुंडे भगिनींच्या मागे एकवटला!

स्व. वसंतराव नाईक यांचे नातू आ. निलय नाईकही बीड जिल्हयात प्रचाराला 

बीड (प्रतिनिधी) :- दि. १४ ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यावर आ. विनायक मेटे व बाबुराव पोटभरे यांनी केलेल्या टीकेनंतर समस्त बंजारा समाज मुंडे भगिनींच्या मागे एकवटला आहे. ' हमार छोरीरो, अपमान कोणी हेयंदेवाळ ' अशा शब्दांत समाजातील सर्व सामान्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

   महाराष्ट्रातील बंजारा समाज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. मुंडे साहेबांनी देखील या समाजावर भरभरून प्रेम केले आहे. संपूर्ण बंजारा समाज मुंडे साहेबांना आपला नेता मानतो. २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजाची भूमिका निर्णायक राहिली आहे. हा समाज आजही मुंडे साहेबांचे कायम स्मरण करतो, त्यांच्या निधनानंतर बीडमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे हया रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ ना. पंकजाताई मुंडे हया कुटूंब प्रमुख या नात्याने एकट्याने सर्वाशी लढा देत आहेत, अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडणे योग्य नाही, त्यांना आता नाही तर केव्हा साथ द्यायची अशी भावना बंजारा समाजातील सर्व सामान्यांची झाली आहे. 

मेटे, पोटभरेंबद्दल संताप
------------------------------
आ. विनायक मेटे आणि बाबूराव पोटभरे यांनी ना. पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांच्याविषयी अपशब्द वापरून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेमुळे बंजारा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'हमार छोरीरो, अपमान कोणी हेयंदेवाळ ' म्हणजे     आमच्या लेकीचा कोणी अपमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देवू असा इशाराच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार, वसंत राठोड, भूषण पवार यांनी दिला आहे. 

स्व. वसंतराव नाईकांचे नातू आ. निलय नाईक डाॅ. प्रितमताईंच्या प्रचाराला 
-----------------------------
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे नातू आ. निलय नाईक हे आजपासून डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्हयात ठिक ठिकाणी तांड्यावर भेटी देत आहेत. आज त्यांनी परळीत ना. पंकजाताई मुंडे यांची निवासस्थानी भेट घेतली. डाॅ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्य देण्यासाठी संपूर्ण बंजारा समाज जीवाचे रान करत आहे, त्या पुन्हा विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आ. नाईक हे दोन दिवस जिल्हयात असून परळी, माजलगांव आणि गेवराई तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या पाठिमागे समाजाने खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन करत आहेत.

No comments:

Post a comment