तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

परळीच्या वेशीत जातीधर्माचे किळसवाणे राजकारण चालणार नाही
बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी येथे ना. पंकजाताई मुंडेंच्या झंझावाती सभा

खा. प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे केले आवाहन


बीड (प्रतिनिधी) :- दि. १० ---- खा. प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात हजारो कोटींचे राष्ट्री महामार्ग आणले, रेल्वे बीडच्या वेशीत आली आहे. बीड जिल्ह्यात आलेली विकासाची गंगा पाहून सैरभैर झालेल्या विरोधकांकडे आता मुद्देच उरले नाहीत त्यामुळे ते जाती-धर्माची ढाल पुढे करत आहेत. परंतु, परळीच्या वेशीत हे जातीपातीचे राजकारण चालणार नसल्याचा इशारा ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला. परळी मतदार संघातील बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी  येथे आज झालेल्या त्यांच्या झंझावाती सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा सुदृढ करण्यासाठी  खा. प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

बुधवारी सायंकाळी ही प्रचारसभा पार पडली. जिल्हाभरात ना. पंकजाताई मुंडेंच्या सभांना मिळणारा उदंड प्रतिसादाचा शिरस्ता बर्दापूर, घाटनांदूर व उजनी पाटी येथेही पहावयास मिळाला. सभेला ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना पंकाजाताई म्हणाल्या कि, स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा राजकीय उदय रेणापूर मतदार संघातून झाला. त्यावेळी बर्दापूर त्या मतदार संघात होते. मुंडे साहेबांनी या भागातील जनतेची ४० वर्षे सेवा केली. त्यांना तसेच प्रेम इथल्या जनतेनेही दिले. आजवर बर्दापूरमधील एकही मतदान केंद्र आम्हाला मायनस (वजा) झालेले नाही. त्यांच्यानंतर प्रीतमताई मुंडे या खासदार झाल्या. पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात हजारो कोटींची विकासकामे खेचून आणली. राष्ट्रीय महामार्ग तर जवळपास पूर्ण होत आलेच आहे, तर नगर बीड परळी रेल्वेसाठी आतापर्यंत २,८०० कोटींचा निधी आला आहे. ग्रामविकास खाते माझ्याकडेच आहे आणि परळी मतदार संघही माझा आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या काळात या भागावर विविध अनुदान आणि योजनांचा वर्षाव झाला आहे. एकट्या बर्दापूर ग्राम पंचायतला सहा कोटींचा निधी मिळाला आहे, एवढा तर मागच्या ४० वर्षात एकत्रितरित्या देखील मिळाला नसेल. घरोघर शौचालये झाली, चुलीसमोर बसणाऱ्या महिला आता गॅससमोर बसू लागल्या आहेत. 

त्यांना जातीशिवाय कांहीच आठवत नाही
--------------------------
जिल्ह्यात विकासाची गंगा खळखळून वाहत असताना विरोधातील कुठले मुद्देच शिल्लक नसल्याने विरोधक आता बिथरले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आता जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळण्यास सुरुवात केली. आहे. परंतु, याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्यामुळे परळीच्या वेशीत जातीपातीचे किळसवाणे राजकारण चालणार नाही असे त्यांनी सुनावले. ‘ते’ लोक पाहुण्यारावळ्याचे संबंध शोधात तुमच्यापर्यंत येतील. पण विकासाच्या बाबतीत आम्ही जातपात पाहणार नाही असे त्यांना ठणकावून सांगा आणि चहापाणी करून वाटे लावा असा सल्लाही पंकजाताईंनी दिला. माझी बहिण खा. प्रीतमताई मुंडे ही उच्च शिक्षीत आहे, समंजस आहे. कुठलाही बडेजाव करत नाही. सर्वसामान्यात मिसळते.  तिच्याकडे विकासाची दृष्टी आहे. तिच्या माध्यमातून होणारी विकासकामे अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी तिला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन ना. पंकाजाताई मुंडे यांनी केले. 

बचत गटांमुळे महिला सक्षम
--------------------------
बचत गटांच्या माध्यमातून मतदारसंघातील   महिला सक्षम झाल्या आहेत, परिणामी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बचतगटे अधिक सशक्त करण्यासाठी बर्दापूर परिसरातील जवळपास ३० बचतगटांना आतापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यातही बचत गटांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून हातात खेळणारा पैसा महिलांनी योग्य ठिकाणी लावावा, नवऱ्याच्या हाती पैसे देऊ नयेत असा मिश्कील सल्लाही पंकजाताईंनी दिला. 

हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है?
------------------------------
आजवर कधीही इकडे न आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार आता फक्त मत मागण्यासाठी इकडे येतील. ते आले कि त्यांना विचारा, ‘हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? इकडे तुमचे काहीच नाही. आम्ही फक्त विकासालाच मत देणार असे त्यांना निक्षून सांगा असे आवाहन पंकजाताईंनी केले. 

ही तर चांडाळ चौकडी - मुळूक
-----------------------------
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील टीमचा उल्लेख अलिबाबा चाळीस चोर असा केला. हाच धागा पकडून पंकजाताई म्हणाल्या, चाळीस कुठे हो? ही तर चांडाळ चौकडी आहे. यांच्या कुरापतींना कंटाळून राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्यासोबत येत विकासाची कास धरत आहेत असे त्यांनी सांगितले.

   या सभेस माजी आमदार गोविंदराव केंद्रे, प्रवीण घुगे, रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक,  गयाताई कराड, हाबूबाई, अविनाश मोरे, संजय गिराम, विशाल मोरे, शामराव आपेट, बाबू पटेल, कुरेशी, गणेश कराड, प्रदीप गंगणे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment