तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

धनंजय मुंडेंचा शेवटच्या टप्यात परळी मतदार संघात झंझावात ;
 राडी, बर्दापूर, घाटनांदुर, मांडव्याच्या सभेत दिसले बदलाचे वारे परळी मतदार संघावर

अन्याय करणार्‍या भाजपाला धडा शिकवा- धनंजय मुंडे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दि.15 लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शेवटच्या टप्प्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघात झंझावाती प्रचार दौरा काढला. मतदार संघात एकाच दिवशीच्या सहा सभांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे परळीतही बदलाचे वारे वाहत असून, मतदार संघावर सर्वाधिक अन्याय करणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

   आज तालुक्यातील राडी, बर्दापूर, घाटनांदुर तर परळी तालुक्यातील मांडवा येथे सायंकाळ पर्यंतच्या झंझावती 4 सभांमधून बोलताना धनंजय मुंडे यंानी भाजपा नेतृत्वाने परळी मतदार संघावर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. इथलाच आमदार, इथलाच खासदार, तेच मंत्री, त्यांचीच केंद्रात आणि त्यांचीच राज्यात सत्ता असताना परळी विधानसभा मतदार संघात पंकजाताई किंवा खासदारांनी केलेले एकतरी ठळक काम दाखवा असे आव्हानच दिले. परळीच्या चारही बाजुने खोदून ठेवलेले खड्डे एवढीच काय ती पंकजाताईंची देण असल्याचा टोला त्यांनी लगावला. वैद्यनाथच्या माध्यमातून शेतकर्‍यांची लुट केली, थर्मल बंद पाडले, साधी परळी-मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, पंकजाताई तुम्ही परळीसाठी नेमकं कोणते काम केले ? हे सांगा असा सवाल केला.

      आजच्या सभांना मिळालेला प्रतिसाद म्हणजे परळी विधानसभा मतदार संघाचे बदललेले वारे दिसून येत आहेत. परळीतून जास्तीत-जास्त लीड देऊन बजरंग सोनवणे यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

बजरंग बप्पांचा विजय निश्‍चित- प्रा.टि.पी.मुंडे

      बजरंगबप्पांच्या उमेदवारीने भाजपाच्या पायाखालील वाळू घसरली असून, त्यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा यावेळी कॉंग्रेसचे नेते प्रा.टि.पी.मुंडे यंानी केला. देशाचा कौल ठरवणारी ही निवडणुक असल्याने कुठल्याही भूल-थापांना बळी न पडता सोनवणेंना विजयी करण्याचे आवाहन राजेसाहेब देशमुख यांनी केले. बजरंग सोनवणे यांचा भाजपाने धसका घेतला असल्याचे ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील म्हणाले, तर बीड जिल्ह्यात आता एकच हवा जय बजरंग बली अशी घोषणा संजय दौंड यांनी दिली.
राडी येथील सभेस विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, राजपाल लोमटे, तालुकाध्यक्ष रणजित लोमटे, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, प्रा.विजय मुंडे, विलासकाका सोनवणे, आबासाहेब पांडे, बाळासाहेब देशमुख, प्रशांत जगताप, शिरीष मुकडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment